शैक्षणिक
कर्नाटक के-सेट २०२६ परीक्षेत अक्कलकोटच्या डॉ. धनय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली २१२ विद्यार्थी उत्तीर्ण

रमेश, शशांक आणि अर्पिता यांना अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा राज्यक्रमांक
अक्कलकोट (प्रतिनिधी) — अक्कलकोट येथील शिक्षक डॉ. धनय्या कौटगीमठ यांच्या यूट्यूबवरील मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतलेल्या २१२ विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्य सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेत (के-सेट २०२६) यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी, दिव्यांग उमेदवार, गृहिणी, पोलीस कर्मचारी आणि माजी सैनिक यांचा समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ही परीक्षा घेतली. परीक्षेचा निकाल २० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. हावेरीचे प्रा. रमेश यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. कलबुर्गीचे प्रा. शशांक यांनी तिसरा, तर प्रा. अर्पिता यांनी चौथा क्रमांक मिळविला.
गदगचे दृष्टिहीन प्रा. पुट्टराज तसेच चित्रदुर्गच्या प्रा. सविता, यादगिरीचे प्रा. सोपाण्णा आणि बीदरच्या प्रा. जयदेवी या दिव्यांग उमेदवारांनीही परीक्षेत यश संपादन केले. अक्कलकोट तालुक्यातील तोळणूरचे सुपुत्र प्रा. धरेप्पा सांगोळगी यांनी बेंगळुरू येथे पोलीस सेवेत कार्यरत असताना समाजशास्त्र विषयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. चिक्कमंगळूरच्या प्रा. रक्षिता यांनी घरची जबाबदारी सांभाळत यश मिळविले. बेळगावचे माजी सैनिक प्रा. गोपाळ पुजारी हेही यशस्वी उमेदवारांपैकी एक आहेत.
डॉ. कौटगीमठ हे अक्कलकोट येथील केएलई मंगरुळे माध्यमिक शाळेत इंग्रजीचे शिक्षक आहेत. देशातील विविध राज्यांत नेट, सेट आणि शिक्षक पात्रता परीक्षा मिळून ते स्वतः ८० वेळा उत्तीर्ण झाले आहेत. या अनुभवाच्या आधारे २०२२ पासून ते दररोज सायंकाळी एक तास यूट्यूबवरून कन्नड, मराठी आणि इंग्रजी भाषांत मोफत मार्गदर्शन करतात. अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि परीक्षेची तयारी सातत्याने कशी करावी, यावर त्यांच्या व्याख्यानांचा भर असतो.
डॉ. कौटगीमठ यांनी आजवर सुमारे दोन हजार व्याख्यानांचे व्हिडिओ तयार केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ ६५ हजार विद्यार्थी घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १,७०० विद्यार्थ्यांनी सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांबरोबरच नोकरी किंवा घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या उमेदवारांनाही या उपक्रमामुळे घरबसल्या परीक्षेची तयारी करण्याची संधी मिळत आहे.



