सामाजिक

अक्कलकोटमध्ये पौर्णिमा मौन ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१२ तासांच्या ध्यानसाधनेत राज्यभरातील साधकांचा सहभाग; जलसमृद्धी व सर्व जीवांच्या कल्याणाचा सामूहिक संकल्प
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ध्यान अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने मैंदर्गी रोडवरील भोसले मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य पौर्णिमा मौन ध्यान शिबिराला राज्यभरातून आलेल्या साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटे ५ ते सायंकाळी ५ अशा १२ तासांच्या या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील साधकांनी सहभाग घेतला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात पहाटेच्या संगीत ध्यानाने झाली. दिवसभर सामूहिक ध्यान, योग, सामुदायिक नृत्य, ज्ञानसत्र, अनुभूती कथन, EFT टॅपिंग आणि प्रश्नोत्तर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशाखापट्टणम येथील कलाकारांच्या संगीत ध्यान सत्राने विशेष रंगत आणली.
या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाचा समतोल, जलसमृद्धी आणि सर्व जीवांच्या कल्याणाचा सामूहिक संकल्प. विशेष म्हणजे शिबिरानंतर अक्कलकोट तालुक्यातील काही गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने साधकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या अनुभवाकडे जलसमृद्धीच्या संकल्पाच्या दिशेने निसर्गाकडून मिळालेला सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जात आहे.
भंडारा, पालघर, अकोला, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव यांसह विविध भागांतून साधक सहभागी झाले होते.
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता, सकारात्मक विचार, एकाग्रता आणि आत्मचिंतनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, तसेच ध्यान संस्कृतीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
शिबिराच्या यशस्वितेसाठी ओंकारेश्वर उटगे, विश्वनाथ देवरमनी, विद्याधर गुरव, डॉ शिवराय अडवितोटे, श्रीनाथ पराणे मनोज जगताप, दत्ता कटारे, संतोष जवळगी, संतोष जवळगे, प्रितेश किलजे आणि स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांनी व सोलापूर पिरॅमिड मास्टर्स विशेष परिश्रम घेतले.
‘स्वतः ध्यान करा, सकारात्मक बना आणि संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचा संकल्प करा’ हा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला. अक्कलकोटमध्ये ध्यान संस्कृतीच्या प्रसारासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button