सोलापूर

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजप पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व; १९ पैकी १८ जागांवर विजयी

सोलापूर (प्रतिनीधी) –
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत ‘सहकार विकास पॅनल’ ने दणदणीत विजय मिळवला आहे. संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी तब्बल १८ जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर विरोधी असलेल्या मोहिते-पाटील पुरस्कृत ‘स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल’ला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘सहकार विकास पॅनल’ मोठ्या मतांनी निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल’ उभे करून १९ पैकी ९ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र अखेर जयकुमार गोरे यांची रणनीती यशस्वी ठरली.

१० जागा बिनविरोध, ९ पैकी ८ जागांवर विजय
बँकेच्या १९ जागांपैकी १० उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यात मंगळवेढ्यातून सिद्धेश्वर आवताडे यांचाही समावेश आहे. उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष मतदानातही भाजप पुरस्कृत पॅनलने ८ जागा जिंकल्या.

मोहिते-पाटील गटाचे अर्जुनसिंह मोहिते-पाटील हे माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून विजयी होऊन त्यांनी माळशिरसचा गड राखला. तोच विरोधकांचा एकमेव विजय ठरला.

सर्वात चुरशीची लढत – मनीष देशमुख विरुद्ध अमोल शिंदे –
या निवडणुकीतील सर्वात चुरशीची लढत ‘बँक व पतसंस्था’ गटात झाली. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख आणि मोहिते-पाटील पॅनलचे उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत रंगली. अखेर मनीष देशमुख यांनी अवघ्या २८ मतांनी विजय खेचून आणला.

निकाल जाहीर झाल्यानंतर मतमोजणी केंद्रात एक हृद्य क्षण पाहायला मिळाला. विजयी उमेदवार मनीष देशमुख यांनी पराभूत झालेले विरोधक अमोल शिंदे यांना प्रेमाने मिठी मारली. निवडणूक संपली, पण आपलेपणा आणि सहकाराची परंपरा कायम आहे, असा संदेश या मिठीतून देण्यात आला.

यावेळी बोलताना मनीष देशमुख म्हणाले, _”सर्वच नेत्यांनी मला मदत केली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली.”

विजयी उमेदवारांची यादी –
बिनविरोध (१०) : राजेंद्र राऊत (बार्शी), प्रशांत परिचारक (पंढरपूर), विक्रांत (बाळराजे) पाटील (मोहोळ), सिद्धेश्वर आवताडे (मंगळवेढा), यशराज शिंदे (माढा), श्रीदीप हसापुरे (दक्षिण सोलापूर), पृथ्वीराज माने (उत्तर सोलापूर), शंभूराजे जगताप (करमाळा), सचिन कल्याणशेट्टी, अजिंक्यराणा पाटील (ओबीसी)

निवडून आलेले (८) :बाबासाहेब देशमुख (सांगोला), अर्चना घाडगे (महिला), शामल बागल (महिला), राजेंद्र बंदीछोडे (भटक्या जमाती), रणजितसिंह शिंदे (कृषी व प्रक्रिया), मनीष देशमुख (बँक व पतसंस्था), सूर्यदत्त साळुंखे (दूध संस्था), महादेव कांबले (अनुसूचित जाती)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button