शिर्डीच्या साईबाबा संस्थानवर गॅस टंचाईचे सावट; भाविकांना मिळणार केवळ एकच लाडू प्रसादाचे पाकीट

शिर्डी – – इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे देशासह महाराष्ट्रात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या गॅस टंचाईचा फटका आता शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा संस्थानला बसला आहे. शिर्डीत दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना प्रसाद म्हणून लाडूचे पाकीट दिले जाते. परंतु, मर्यादित गॅस साठ्यामुळे साई संस्थानने गॅस बचतीसाठी प्रत्येक भाविकाला आजपासून केवळ एकच लाडू प्रसादाचे पाकीट देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
साई संस्थानाच्या माहितीनुसार, सध्या दररोज ४५ हजार लाडू पाकिटांची विक्री होते, तर दर्शन रांगेत ५० हजार बुंदी पाकिटांचे मोफत वाटप केले जाते. लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या इंधनात कपात केल्यामुळे संस्थानाला आर्थिक फटका बसणार आहे. सध्या लाडू तयार करण्यासाठी केवळ १० ते १२ दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे. त्यामुळे गॅसच्या काटकसरीसाठी भक्तांना रोज एक लाडू पाकीट देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई संस्थानने प्रसादालयातील भोजन व्यवस्थेतही मोठा बदल केला आहे. यापुढे प्रसाद भोजनात दोन भाज्यांऐवजी एकच भाजी दिली जाईल. तसेच, डाळ-भाताऐवजी तांदळाची खिचडी दिली जाणार आहे. मेनूमधून डाळ-भात वगळून आता भाविकांना एक भाजी, चपाती आणि खिचडी असे साधे भोजन दिले जाईल. उपलब्ध गॅस काटकसरीने वापरण्यासाठी हा बदल केला असून, भोजन तयार करताना संस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प (सोलर प्लांट) सध्या मोठा आधार ठरत आहे.
दरम्यान, नाशिकच्या मनमाडजवळील इंडेन बॉटलिंग प्लांटमधून नाशिक आणि इतर जिल्ह्यांतील गॅस पुरवठ्यावरही युद्धजन्य परिस्थितीमुळे गंभीर परिणाम झाला आहे. पूर्वी या प्रकल्पातून रोज १०० गाड्या गॅस सिलिंडर भरून जायच्या. आता ही संख्या घटून केवळ ३० ते ३५ गाड्यांवर आली आहे. प्रकल्पातील २ फिलिंग पॉईंट पैकी सध्या एकच पॉईंट सुरू आहे. गुजरातच्या हाजीराबाद येथून गॅस टँकर येत असले तरी, भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी कोटा कमी करण्यात आला आहे.


