शैक्षणिक
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेची इमारत अचानक पडल्याने विद्यार्थी तसेच शिक्षक जखमी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेची इमारत अचानक पडल्याने आठ विद्यार्थी तसेच दोन शिक्षक जखमी झाले आहेत. सदरची घटना ही मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मैंदर्गी तसेच दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून धीर देण्यात आला. गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
बबलाद येथील शाळेची इमारत पडल्याने गावात खळबळ उडाली असून पालकातून चिंता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मैंदर्गी आणि दुधनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी तातडीने येऊन जखमी विद्यार्थी व शिक्षकांवर उपचार केले. यामध्ये शिक्षक रमेश शिवमुर्ती ,भीमण्णा गवळी विद्यार्थी यशवंत चांभार , अथर्व मडडी , प्रज्वल बोलदे प्रज्वल नाव्ही , सिद्धाप्पा पुजारी , श्रीकांत मणूरे , लक्ष्मीपुत्र खानापुरे , शरणबसप्पा खानापुरे , दर्शन चव्हाण ,अनुष्का मड्डी , सिद्धार्थ पुजारी , विशाल अचगोंड मानसी खानापुरे , सिद्धार्थ खानापुरे आधी विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना डोक्यास दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी , दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे , गटविकास अधिकारी शंकर कवितके , डॉक्टर मंजुनाथ पाटील ,सनमुख विभुते , इस्माईल मुजावर , चिदानंद गुरव ,जय नाटकर , सूर्यकांत गोविनाड ,रेणुका पवार ,वाहन चालक विलास पोद्दार , सिद्धू नंदर्गी महानंद घंटे आदींनी बबलाद शाळेत भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच जखमी विद्यार्थी व शिक्षकांना माजी सरपंच राजकुमार लकाबशेट्टी , महांत दर्शनाळ , श्रीकांत मणूरे ,सुरेश रोडगे ,अश्फाक बोरवाले , बसू पाटील आदींनी मदत केली. अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतींचे ऑडिट करून धोकादायक शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण करण्याची मागणी पालकातून केली जात आहे.




