सामाजिक
यूपीएससीमध्ये हालहळ्ळीचे सुपूत्र बसवराज चंद्रकांत स्वामी यांचे घवघवीत यश

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) हालहळ्ळी (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) ही सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या हालहळ्ळी गावाने आज देशाच्या नकाशावर आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं आहे. याच मातीतील सुपुत्र बसवराज चंद्रकांत स्वामी यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अखिल भारतीय २७९ वा क्रमांक (AIR २७९ ) पटकावून आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.
ही केवळ स्वामी परिवारासाठीच नव्हे, तर संपूर्ण हालहळ्ळी गाव, पंचक्रोशी आणि अक्कलकोट तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण आहे.
जिद्द, गरिबीची जाणीव आणि प्रामाणिक प्रयत्नांचं फळ
दरवर्षी देशभरातून सुमारे १० लाख विद्यार्थी या सर्वात कठीण परीक्षेसाठी बसतात, त्यातून केवळ २ ते ३ हजार विद्यार्थी IAS, IPS, IFS म्हणून निवडले जातात. अशा महासागरातून २७९ वा रँक मिळवणे हे असामान्य कर्तृत्व आहे. बसवराज यांनी आयपीएस (IPS) सेवा निवडली आहे.
त्यांच्या यशामागची कौटुंबिक पार्श्वभूमी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी ज्या घरात कोणालाही स्वतःची सही देखील करता येत नव्हती, अशा कुटुंबात श्रीशैल स्वामी नावाचे एक व्यक्तिमत्व ग्रामसेवक म्हणून उदयास आले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून संपूर्ण परिवाराला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि एका अशिक्षित कुटुंबाचे रूपांतर सुशिक्षित परिवारात केले. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज बसवराज यांनी मिळवलेलं हे यश होय. गरिबीची जाणीव ठेवून जिद्दीने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी अत्युच्च शिखर गाठता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
बसवराज यांनी निवडलेल्या IPS मधील करिअर – अत्युच्च पद आणि बढतीच्या संधी
बसवराज स्वामी यांनी जी भारतीय पोलीस सेवा (IPS) निवडली आहे, त्यात बढतीची एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि शिस्तबद्ध साखळी आहे.
एक IPS अधिकारी आपल्या करिअरची सुरुवात Assistant Superintendent of Police (ASP) म्हणून करतो आणि गुणवत्तेनुसार Director General of Police (DGP) या राज्यातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर (Central Deputation) गेल्यावर CBI संचालक, IB प्रमुख, RAW प्रमुख, NIA महासंचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांसारख्या देशाच्या सर्वोच्च सुरक्षा पदांवरही IPS अधिकारी काम करू शकतो.
बसवराज यांच्या या यशाने हालहळ्ळीतील प्रत्येक तरुणाला स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्याचे बळ मिळाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून देशसेवेच्या सर्वोच्च सेवेत झेप घेतलेल्या या तरुणाचा अभिमान करावा तितका कमीच आहे.
बसवराज चंद्रकांत स्वामी यांचे हार्दिक अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील IPS वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




