गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर जिल्ह्यातील घरगुती व व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर अहवालाची मागणी
सोलापूर : -देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण व युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती तसेच व्यावसायिक (नॉन-डोमेस्टिक) एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीबाबत तातडीने उपाययोजना करण्याची तसेच सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण व युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर देशभर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या असून अनेक ठिकाणी व्यावसायिक (नॉन-डोमेस्टिक) गॅस पुरवठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात गॅस पुरवठ्याबाबत गंभीर अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिक, व्यापारी संघटना तसेच गॅस वितरकांकडून सातत्याने प्राप्त होत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले आहे. अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना दीर्घ रांगा लावाव्या लागत असून काही ठिकाणी वादविवाद व तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याची माहितीही मिळत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, घरगुती एलपीजी हा ग्रामीण व शहरी भागातील लाखो कुटुंबांसाठी अत्यावश्यक स्वयंपाक इंधन आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर या परिस्थितीचा थेट परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, बेकरी, रुग्णालये तसेच इतर लघुउद्योग व व्यापारी आस्थापनांसाठी व्यावसायिक गॅस अत्यंत आवश्यक असून त्यावर हजारो कामगारांचा रोजगार अवलंबून आहे. मात्र सध्या व्यावसायिक गॅस पुरवठा थांबल्यामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या स्थितीत आले असल्याची गंभीर बाब खासदार प्रणिती शिंदे यांनी मांडली आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एलपीजी गॅस साठा व उपलब्धतेची सद्यस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांकडे उपलब्ध असलेला घरगुती व नॉन-डोमेस्टिक गॅस साठा, वितरकांना देण्यात आलेल्या कोट्यानुसार दररोज व साप्ताहिक सिलेंडर वितरणाची माहिती तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांचा तपशील उपलब्ध करून द्यावा, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती देण्याचीही मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. बॉटलिंग प्लांट व डेपोमधून सिलेंडर वेळेवर उचलण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही, जिल्हा पुरवठा अधिकारी, नागरी पुरवठा विभाग व तेल कंपन्यांमधील समन्वय व्यवस्था, काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी करण्यात येत असलेली तपासणी व कारवाई तसेच गॅस पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी तयार केलेल्या कृती योजनेची माहिती प्रशासनाने द्यावी, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर नॉन-डोमेस्टिक (व्यावसायिक) गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती स्पष्ट करण्याचीही मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा थांबविण्यामागील कारणे, काही विशिष्ट व्यावसायिक क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे का याची माहिती तसेच व्यावसायिक गॅस पुरवठा पुन्हा सुरू करण्याबाबतचे संभाव्य वेळापत्रक व नियोजन याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले आहे.
तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियमचे विभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील गॅस वितरक यांची तातडीची बैठक बोलवून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा आणि त्या बैठकीतील निर्णयांची माहिती खासदार कार्यालयास कळवावी, अशीही मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. आवश्यक असल्यास या बैठकीस आपण प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन उपस्थित राहण्यास तयार असल्याचेही खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने वैयक्तिक लक्ष देऊन तातडीने सकारात्मक पावले उचलावीत तसेच या संदर्भातील सविस्तर अहवाल व कृती आराखडा सात दिवसांच्या आत सादर करावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.



