राजकीय
अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची १२ मार्च रोजी निवड !

सभापती आणि उपसभापती निवडीकडे लागले तालुक्याचे लक्ष !
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती ची निवड ही दिनांक १२ मार्च गुरुवारी होणार आहे. अक्कलकोट पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सभापती पदासाठी कोणाला संधी देणार याकडे अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अक्कलकोट पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे बहुमत असून १२ पैकी ८ जागा या भाजपाने जिंकले आहेत. चार जागी शिवसेना शिंदे गटाचे सदस्य निवडून आले आहेत. अक्कलकोट पंचायत समितीचे सभापती पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भाजपामध्ये पान मंगरूळ पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या रश्मी हिप्परगी आणि जेऊर गणातून भाजपाकडून निवडून आलेल्या माजी सभापती विमल गव्हाणे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. रश्मी हिप्परगी आणि विमल गव्हाणे यांच्याकडे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र आहे.
तसेच उपसभापती पदासाठी चपळगाव गणातून निवडून आलेले सागर कल्याणशेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सभापती पदासाठी रश्मी हिप्परगी यांचा विचार सुरू असून त्या ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या पान मंगरूळ गणातून निवडून आले आहेत. अक्कलकोट पंचायत समितीमध्ये भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने आता केवळ सभापती आणि उपसभापती यांच्या नावाची घोषणेची औपचारिकता राहिली आहे. शिवसेनेचे चार सदस्य पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाले असून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या शितल म्हेत्रे या ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या तोळणूर गणातून निवडून आल्या आहेत. सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून शितल म्हेत्रे या अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदी कोणाला संधी देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.






