राजकीय
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची बिनविरोध डीसीसीवर निवड ,शेवटच्या क्षणी संजीवकुमार पाटलांची माघार
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सोसायटी मतदारसंघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले माजी सभापती संजीवकुमार पाटील यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही काहीसा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
अक्कलकोट सोसायटी मतदारसंघातून या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, विश्वेश्वर नागुर तसेच पंचायत समितीचे माजी सभापती संजीवकुमार सिद्रामप्पा पाटील या ठिकाणी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये नागूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. संजीव पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का नाही याबाबत चर्चा सुरू होत्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बरोबर तीन वाजता संजीव पाटील हे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्यासोबत निवडणूक कार्यालयात आले होते. ते बराच वेळ या ठिकाणी थांबून होते. त्यावेळी माहिती घेतली असता समजले की संजीव पाटील हे माघार घेणार नाहीत परंतु पाटलांनी अचानक माघार घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या दोघांसोबत संजीव पाटील यांनी येऊन आपला अक्कलकोट साठी उमेदवारी अर्ज भरला होता.
मात्र अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश सोसायटी या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे आल्याने पाटलांना यंदाच्या निवडणुकीत चांगलीच अडचण झाल्याचे दिसून आले.
दरम्यान यापूर्वी अक्कलकोट तालुक्यातून माजी आमदार सिद्धामप्पा पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक झाले होते आणि आता आमदार सचिन कल्याणशेट्टी हे संचालक म्हणून गेले आहेत.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी अविरोध निवड झाल्याने अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले यावेळी अक्कलकोट सह ग्रामीण भागात भाजपा कार्यकर्त्यांकडून तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या समर्थकांकडून फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. अक्कलकोट शहरातील विविध ठिकाणी फटाके फोडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या डीसीसी वर अविरोध निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.



