महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या वाढत्या कर्जाची चिंता नको, खर्चाचा उद्देश पाहा; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना उत्तर

​मुंबई – महाराष्ट्र राज्य सध्या अत्यंत वेगाने प्रगतीपथावर असून, जर महाराष्ट्र हा एक स्वतंत्र देश असता, तर तो जगातील ३०वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला असता. विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकला. ज्या राज्यांची कर्ज फेडण्याची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी असते, ती राज्ये उत्तम कामगिरी करत असल्याचे मानले जाते. या निकषानुसार महाराष्ट्राची क्षमता १८ टक्के इतकी आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे भक्कम आहे. राज्याच्या माथ्यावरील कर्जाचा आकडा वाढतोय यावर आक्षेप घेण्यापेक्षा तो पैसा कोणत्या विकासकामांवर खर्च होत आहे, याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
​राज्याच्या जीडीपीची तुलना जागतिक स्तरावरील पहिल्या ३५ देशांशी केल्यास, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, फिलिपिन्स, नॉर्वे, व्हिएतनाम आणि बांगलादेश यांसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक विस्तारलेली आहे. सध्याचा विकासदर असाच टिकवून ठेवल्यास, आगामी दोन ते तीन वर्षांत आपण युएई आणि सिंगापूर या प्रगत देशांनाही नक्कीच मागे टाकू, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​कोणत्याही राज्याची राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांच्या खाली असणे आदर्श मानले जाते. महाराष्ट्राने अनेक कल्याणकारी योजना राबवूनही राज्याची राजकोषीय तूट २.७८ टक्के राखण्यात यश मिळवले आहे, जे ३ टक्क्यांच्या मर्यादेत आहे. याशिवाय, महसुली तूटदेखील १ टक्क्याच्या आत रोखण्यात राज्याला मोठे यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
​२०१३-१४ या आर्थिक वर्षात राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटी रुपये होता. तो आता गेल्या १० वर्षांत वाढून ५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, या १० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत तब्बल तिप्पट वाढ नोंदवली गेली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न ३ लाख १७ हजार ८०३ रुपयांवरून ३ लाख ४७ हजार ९०३ रुपयांपर्यंत वाढले असून, या निकषात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची मोठी व्याप्ती पाहता, आपला विकासदर अत्यंत समाधानकारक आहे. सहसा मोठ्या राज्यांचा विकासदर तुलनेने कमी असतो, मात्र महाराष्ट्राने आपला उच्च विकासदर सातत्याने टिकवून ठेवला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button