भीमराव शिंदे जनसेवेसाठी असेच लढत राहा, काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे

सोलापूर ( प्रतिनिधी )सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव शिंदे यांनी आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी भीमराव शिंदे यांना उद्देशून मार्गदर्शनपर शब्दांत सांगितले की, भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ व समाजसुधारक, कोट्यवधी जनतेचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांसाठी समर्पित केले. समाजातील वंचित व शोषितांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अभूतपूर्व संघर्ष केला आणि त्यांच्यामुळेच भारताला सर्वसमावेशक व सशक्त संविधान लाभले.
“आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत. भीमराव शिंदे जी, तुमच्याकडे संघर्षाचा मोठा वारसा आहे. अन्यायाच्या विरोधात सामान्य माणसाच्या मनात मशाल पेटविण्याचे कार्य तुम्ही करत आहात. अन्यायाला भिडण्याची ताकद तुमच्यात आहे. जनसेवेसाठी तुम्ही सातत्याने काम करत आहात. आपल्या प्रभागातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्याची निश्चितच पुढील काळात काँग्रेस पक्ष दखल घेईल,” असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले की, “भीमराव शिंदे जी, जनसेवेसाठी असा संघर्ष करत राहा. मी स्वतः, खासदार प्रणिती शिंदे आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.” याप्रसंगी सचिन सुरवसे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



