भाजपचा ४ नोव्हेंबरला सोलापुरात भाजपचा मोर्चा ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’चा नारा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची विरोधकांवर टीका

सोलापूर:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश जागतिक स्तरावर प्रगती करत असून, जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. संरक्षण क्षेत्रातही भारताची ताकद वाढत आहे. देश विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. विरोधकांच्या कथित ‘फेक नरेटिव्ह’ला प्रत्युत्तर देण्यासाठी येत्या ४ नोव्हेंबर रोजी सोलापुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषद आणि कार्यकर्ता बैठकीत गोरे बोलत होते. देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना विरोधकांकडून न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बेकायदेशीर आंदोलने उभी करून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशभरात सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरही विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहेत. अनेक नागरिकांची नावे एकापेक्षा अधिक मतदार याद्यांमध्ये आहेत, तर काही ठिकाणी दुबार नोंदी आढळतात. हा गोंधळ दूर करून मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगावर आरोप करणे, हाच विरोधकांचा अजेंडा असल्याची टीका गोरे यांनी केली.
विरोधकांकडून केवळ आरोप केले जात असताना भारतीय जनता पक्षाने जबाबदारीने काम केले आहे. पक्षाने आपले १०० टक्के बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्त करून मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाला सहकार्य केले आहे, असे गोरे यांनी सांगितले.दुसरीकडे, विरोधक जंतर-मंतरवर जाऊन डफली वाजवत आंदोलन करतात आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जनतेची दिशाभूल करणे आणि चुकीचे कथानक पसरवणे, एवढेच काम विरोधकांकडून केले जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या कथित फेक नरेटिव्हला आणि अराजकतेच्या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख आंदोलन सोलापुरातून उभारण्यात येणार आहे. ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ या घोषवाक्याखाली ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी होतील, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत भाजपची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजा राऊत, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृहनेते नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.




