माळशिरसच्या जब्बार अत्तार यांची शेतीतून लाखांची उलाढाल

MPSC चा पेपर फुटला अन तो बनला शेतकरी
सोलापूर – परीक्षेतील गैरप्रकारामुळे निराश न होता अपयशावर मात करत जिद्दीच्या बळावर यशाचे शिखर कसे गाठायचे, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बी.ए. पदवीधर शेतकरी जब्बार अत्तार यांनी घालून दिले आहे. एम.पी.एस.सी.चा पेपर फुटल्याने पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न भंगल्यानंतर त्यांनी निराश न होता शेतीची वाट धरली आणि आज ते सेंद्रिय जांभूळ शेतीतून वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
जब्बार अत्तार यांनी 1995 मध्ये एम.पी.एस.सी.ची परीक्षा दिली होती. मात्र, त्यावर्षी पेपर फुटल्यामुळे त्यांच्या मनात पोलीस खात्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून थेट शेती करण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यांनी आपल्या केवळ सव्वा एकर शेतीत संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने जांभळाची लागवड केली. झाडांमध्ये 29 बाय 20 फूट अंतर ठेवून आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन करत त्यांनी कोणतीही मजूर न लावता स्वतः जांभळाच्या बागेची निगा राखली. इतकेच नव्हे तर, जांभळाच्या बागेत त्यांनी लसूण, हरभरा, सोयाबीन आणि कांद्याचे आंतरपीकही घेतले आहे.
त्यांच्या या सेंद्रिय जांभळांना पुणे आणि अकलूज येथील बाजारात मोठी मागणी असून 250 रुपये प्रति किलो दराने विक्री होते. याशिवाय, मधुमेहावर अत्यंत गुणकारी असणारी जांभळाची साल आणि पानांपासून त्यांनी आयुर्वेदिक पावडर तयार केली आहे. या पावडरची 300 रुपये प्रति 250 ग्रॅम या दराने विक्री केली जाते.
जब्बार अत्तार यांना जांभूळ विक्रीतून वर्षाला 4 लाख रुपये आणि पावडर विक्रीतून 1 लाख रुपये असा एकूण 5 लाख रुपयांचा निव्वळ

नफा मिळत आहे. एम.पी.एस.सी.चा पेपर फुटल्याने एका तरुणाचे सरकारी नोकरीचे स्वप्न जरी अपुरे राहिले असले, तरी त्यांनी कठोर परिश्रम आणि आधुनिक सेंद्रिय तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीत यशस्वी होऊन इतरांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.



