कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार

पॉवरस्टार या उपाधिने गौरविलेले कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचा आज दि. 29 ऑक्टोबर स्मृतीदिवस. त्यांचे १४ चित्रपट सलग १०० दिवस चित्रपटगृहात चालले होते. ते कन्नडमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
पुनीत राजकुमार यांचा जन्म १७ मार्च १९७५ रोजी सुपरस्टार डॉ. राजकुमार आणि निर्मात्या पर्वतम्मा राजकुमार यांच्या घरी झाला. पाच भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. वयाच्या अवघ्या सहाव्या महिन्यांत ते प्रेमदा कनिके या चित्रपटातून त्यांचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले होते. नंतर मोठे झाल्यावर धाकटा पुनीत त्याची मोठी बहीण पौर्णिमासोबत चित्रपटाच्या सेटवर जायचा. त्यामुळे बालपणापासून पुनीत यांना चित्रपटांमध्ये रस वाटू लागला. या कारणास्तव त्यांनी लहान वयातच शाळा सोडली. मात्र, नंतर त्यांनी होम ट्यूटरच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमाही केला. शालेय वयातच ते अनेक चित्रपटांमध्ये ते बालकलाकार म्हणून झळकले.
पुनीत राजकुमार १० वर्षांचे असताना ‘बेट्टाडा हुवू’ या चित्रपटासाठी त्यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटात ते बालकलाकाराच्या भूमिकेत होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, तीन साऊथ फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाले होते. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या एकूण २८ चित्रपटांपैकी वसंत गीता (१९८०), भाग्यवंता (१९८१), चालिसुवा मोडगालू (१९८२), एराडू नक्षत्रगालू (१९८३), भक्त प्रल्हाद, यारीवानु आणि बेट्टाडा हूवू (१९८५) मधील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे.
पुनीत केवळ अभिनेताच नाही तर गायक आणि टीव्ही प्रेझेंटरही होते. ‘आकस्मिक’ या चित्रपटासाठी त्यांनी कॉश्च्युम डिझाइन केले होते. पुनीत यांना स्टेडिकॅमची माहिती होती. स्टेडिकॅमचा वापर चित्रपटांमध्ये स्टंट आणि कार चेस यांसारख्या दृश्यांना शूट करण्यासाठी केला जातो. त्यांना नवीन ब्रँडचे कॅमेरे आणि चित्रपटांसाठी हाय डेफिनेशन लेन्सबद्दल शिकणे देखील आवडायचे. त्यांनी दोन टीव्ही शोची निर्मितीही केली होती. पुनीत हे पीआरके ऑडिओ या संगीत लेबलचे संस्थापक आणि मालक होते. १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत, या चॅनेलचे YouTube वर १५.१ लाख यूजर होते.
पुनीत एफस्क्वायर, मालाबार गोल्ड, मनप्पुरमचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. ते कर्नाटक दूध महासंघ ‘नंदिनी’चे ब्रँड अॅम्बेसेडर देखील होते. पुनीत यांनी यासाठी कोणतेही मानधन घेतले नव्हते. २००८ आणि २००९ मध्ये ते IPL संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. १४ चित्रपट जवळपास १०० दिवस थिएटरमध्ये चालणारे ते सँडलवूड इंडस्ट्रीतील एकमेव अभिनेते होते. कन्नड चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार म्हणूनदेखील पुनीत प्रसिध्द होते. एका चित्रपटासाठी ते २ ते ३ कोटी मानधन घेत असत तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी ते १ कोटी रुपये मानधन घेत असत.
पुनीत यांची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ केवळ त्यांच्या अभिनयामुळेच नव्हती. तर खऱ्या आयुष्यातही ते दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले जात असत. पुनीत ४६ मोफत शाळा, २६ अनाथाश्रम, १६ वृद्धाश्रम आणि १९ गोशाळा चालवायचे. याशिवाय अनेक कन्नड भाषिक शाळांनाही ते आर्थिक मदत करत असत. २०१९ मध्ये उत्तर कर्नाटकात पूर आला असतांना पुनीत राजकुमार लोकांच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाख रुपये दिले होते. संपूर्ण देश कोरोना महामारीशी झुंज देत असतांना त्यांनी कर्नाटक सरकारच्या मदत निधीसाठी ५० लाख रुपये दिले होते. पुनीतच्या यांना त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या आईनेही पूर्ण सहकार्य केले. ते त्यांच्या आईसोबत मिळून म्हैसूरमध्ये शक्तीधाम नावाचा आश्रम चालवत होते. तिथे त्यांनी हजारो मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. ही एक सेवाभावी संस्था आहे. बलात्कार पीडितांना मदत, मानवी तस्करीविरोधात मोहीम, वेश्याव्यवसायाच्या विरोधात ही संस्था काम करते.
२९ ऑक्टोबर २०२१ मध्ये वयाच्या ४६ व्या वर्षी पुनीत राजकुमार जीममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी ही गोष्ट पत्नी अश्विनीला सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या विक्रम रुग्णालयात दाखल केले. पुनीत आजारी असल्याची बातमी समजताच रुग्णालयासमोर लोकांनी गर्दी जमली आणि त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी चाहते प्रार्थना करु लागले. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली.
त्यांच्या मृत्यूनंतर बंगळुरूमधील अनेक चित्रपटगृहे दिवसभर बंद राहिली आणि शहरात चित्रपटांच्या प्रमोशनवरही बंदी घालण्यात आली. पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर शहरातील अनेक प्रसिद्ध पबही बंद करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून बंगळुरूमध्ये दोन रात्री दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लवकर घरी पाठवले होते.
पुनीत राजकुमार यांचे पार्थिव चाहत्यांना दर्शनासाठी २ दिवस बंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ३० लाखांहून अधिक लोक पोहोचले होते. भारतीय इतिहासातील हा सर्वात मोठा अंत्यसंस्कार होता. चाहत्यांवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगळुरूमध्ये कलम १४४ लावण्यात आले. स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीमुळे विठ्ठल माल्या रोडवरून कोणतेही वाहन जाऊ शकले नाही. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पुनीत यांनी नेत्रदान केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर, संपूर्ण कर्नाटकातील १ लाख लोकांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कर्नाटकात नेत्रदानाचा आकडा अचानक अनेक पटींनी वाढला होता.
पुनीत यांची त्यांच्या चाहत्यामध्ये इतकी क्रेज होती की, त्यांच्या निधनाची बातमी ऐकून एका चाहत्याने आत्महत्या केली तर २ जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाचा धक्का लागल्याने चाहत्यांनी केलेल्या आत्महत्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूचा हा आकडा १० वर पोहोचला होता. पुनीत राजकुमार यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा सुमारे १५०० लोकांनी स्वतःचा ईसीजी करुन घेतला होता. यापैकी बहुतेक लोक जिम वर्कआउट करणारे होते.
पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर बंगळुरूमधील एका सरकारी शाळेतील मुलांनी पुनीत यांच्या नावाने सॅटेलाइट बनवून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली होती. बंगळुरूमधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांनी तयार केलेल्या उपग्रहासाठी १.९० कोटी रुपये खर्चून KGS3 उपग्रह विकसित केला होता.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना बेट्टड हुवू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार, ‘अरसू’ चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, ‘राम’ चित्रपटासाठी एकेकेए सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, ‘राज – द शोमन’ या साऊथ स्कोप चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्या पहिल्या जयंतीच्या दिवशी पुनीत राजकुमार यांचा शेवटचा चित्रपट ‘जेम्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचे कलेक्शन केले होते. म्हैसूर रोडवरील नयनदहल्ली जंक्शन आणि बन्नेरघट्टा रोडवरील वेगा सिटी मॉल दरम्यानच्या बंगळुरू आऊटर रिंग रोडच्या १२ किलोमीटरच्या भागाला डॉ. पुनीत राजकुमार रोड असे नाव देण्यात आले आहे. बेल्लारी येथील बेल्लारी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी त्यांच्या २३ फूट उंच पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.




