सामाजिक

उमेद अभियानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; प्रभाग समन्वयकावर कारवाईची मागणी

वळसंग येथील तेजस्विनी महिला प्रभाग संघातील महिलांचे पंचायत समितीला निवेदन; मानधन थकवणे, अरेरावी आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप
अक्कलकोट (प्रतिनिधी ): ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) कारभारावर दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वळसंग येथील तेजस्विनी महिला प्रभाग संघातील कॅडर महिलांनी प्रभाग समन्वयक उमेश जाधव यांच्याविरोधात विविध आरोप करत त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात सोमवारी (दि. २६) महिलांनी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे आणि गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले.
वर्षभरापासून मानधन थकविल्याचा आरोप
प्रभाग समन्वयक उमेश जाधव यांनी मागील वर्षभरापासून महिलांचे मानधन थकवून ठेवल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. मानधनाबाबत विचारणा केल्यास अरेरावीची भाषा वापरणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि मानधनातून कपात करणे, अशा तक्रारी महिलांनी केल्या आहेत. बैठकीला काही मिनिटे उशीर झाल्यास महिलांना बैठकीतून बाहेर काढणे तसेच धमकावणे, असे आरोपही करण्यात आले आहेत.
आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
ग्रामसंघाच्या निधीमध्ये अनियमितता, खोटी माहिती देऊन सीआरपी आणि ग्रामसंघाकडून लाखो रुपयांचा निधी काढणे तसेच बनावट धनादेश तयार करून आर्थिक व्यवहार केल्याचे गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानातच महिलांना आपल्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याची बाब या तक्रारीतून समोर आली आहे. संबंधित प्रभाग समन्वयकाला तात्काळ निलंबित करावे, प्रभाग संघाची विशेष बैठक बोलवावी आणि सर्व आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी प्रभाग संघातील कॅडर करिश्मा जमादार, प्रियंका भाले, शैला माणकोजी, श्रीदेवी खोबण, तैमूर शेरीकर ,
भाग्यश्री कामशेट्टी, अंबिका म्हेत्रे ,सारिका बडूरे, प्रज्ञा म्हेत्रे, प्रियंका पुल्लुर, स्वाती गायकवाड, सरस्वती वनिता माळी, शिवयोगी, फरजाना बागवान, कांचन चव्हाण, आसमा सुतार आणि देवप्पा हिरोबा, क्रांती कांबळे, वर्षा हुक्केरी यांच्यासह उमेद अभियानातील अन्य कॅडर महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button