Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अभिनेते राजेश खन्ना यांचा स्मृतीदिन

Admin by Admin
July 18, 2026
in मनोरंजन
0
अभिनेते राजेश खन्ना स्मृतीदिन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

18 जुलैला लाखो चाहत्यांना रडवत राजेश खन्नांनी जगाचा निरोप घेतला. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना…1969 साली आराधना हा सिनेमा रिलीज झाला.आणि हिंदी सिनेमाला सुपरस्टार मिळाला. त्यानंतर सलग 15 सिनेमे हिट्स दिले. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात त्याआधी कुणाच्याही वाटय़ाला न आलेलं स्टारडम, ग्लॅमर, लोकप्रियता, यश या सगळ्याचा धनी असलेला हा माणूस तहहयात आयुष्य स्वत:च्या अटींवर जगला. राजेश खन्ना यांचा काळ संपला, त्यानंतरच्या काळात सिनेमे कमालीचे बदलले, तरीही कुणाचं तरी आपल्या माणसाचं निधन झाल्यासारखी त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेली गर्दी ही या माणसाने त्याच्या काळात काय गारुड केलं होतं, हेच दाखवते.

29 डिसेंबर 1942 साली अमृतसर इथं जन्मलेले जतीन खन्ना, भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये राजेश खन्ना या नावानं ओळखले जाऊ लागले. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी आखरी खत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्याचे काका चुनीलाल खन्ना रेल्वेमध्ये मोठे कॉन्ट्रक्टर होते. त्यांनीच बालपणापासून जतीनचा सांभाळ केला होता व जतीनचे ‘राजेश’ म्हणून नामकरण केले होते. राजेश खन्ना हा मूळचा स्टेज आर्टस्टि होता. अभिनयाची त्याची स्वतची शैली होती. दिसायलाही तो देखणा होता. १९६५ साली युनायटेड प्रोडय़ूसर्सच्या ‘टॅलेण्ट हंट’ स्पध्रेत तो सर्व प्रथम आला होता.
त्याच्या ‘आखरी खत’ (१९६६) या पहिल्या चित्रपटाकडे सिनेदर्शकांनी पाठ फिरवली परंतु हाच चित्रपट बेस्ट फॉरेन मूव्ही म्हणून ऑस्कर पुरस्करासाठी भारतातर्फे पाठविण्यात आला होता. त्याचा ‘बहारों के सपने’ चित्रपट बऱ्यापकी चालला. पण त्याचे सारे श्रेय नायिका आशा पारेख घेऊन गेली होती. राजेश या दुनियेत नवखा होता. आशा पारेखचे इंडस्ट्रीत बऱ्यापकी नाव होते. इथे कुठेतरी त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. त्याक्षणी राजेशने ठरवले की यापुढील चित्रपट माझ्या स्वत:च्या नावावर चालतील. त्यादृष्टीने त्याने जोरदार प्रयत्न चालू केले.
बी. आर. चोप्रांचा ‘इत्तेफाक’ (१९६९) हा लो बजेट गीतविरहित नाटय़पूर्ण रहस्यमय चित्रपट होता. चोप्रांनी तो केवळ २८ दिवसांत पूर्ण केला होता. राजेश खन्ना ‘इत्तेफाक’ व राज खोसलांचा ‘दो रास्ते’ या दोन्ही चित्रपटांत एकाच वेळी काम करीत होता. ‘ इत्तेफाक’मध्ये दिलीप रॉय या वेडय़ाच्या भूमिकेसाठी त्याला दाढी ठेवावी लागली म्हणून ‘दो रास्ते’मध्येही त्याने दाढी ठेवूनच भूमिका केली. १९६८-६९ या उमेदीच्या काळात भूमिका मिळविण्यासाठी चाचपडत फिरणाऱ्या राजेश खन्नाला सुपरस्टार पदापर्यंत घेऊन जाण्यास सर्वात जास्त मदत देवयानी चौबळ या ज्येष्ठ सिनेपत्रकार स्त्रीने केली. तिचा ‘बिलिव्ह इट ऑर नॉट’ हा कॉलम वाचकात प्रचंड लोकप्रिय होता. ती स्वत राजेश खन्नाला बरोबर घेऊन निर्मात्यांना भेटायला जात असे. राजेश खन्ना िडपल कपाडियाशी विवाह करणार आहे, ही गुप्त बातमी केवळ देवयानीलाच माहीत होती. पुढे त्यांच्यात काय बिनसले ते कळले नाही. पण हीच देवयानी राजेश खन्नाचं खासगी आयुष्य वेशीवर टांगू लागली.
असाही आशीर्वाद
देवेंद्र गोयलच्या ‘वचन’ (१९५५) द्वारे राजेंद्र कुमारने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाने अनेक सिनेमागृहात सिल्व्हर ज्युबिली साजरी केली. त्याच्या मागोमाग व्ही. शांताराम यांचा ‘तुफान और दीया’ चोप्रांचे ‘धूल का फूल’ व ‘कानून’ मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया’ प्रदर्शित झाले. हे सर्वच चित्रपट हिट झाले. राजेंद्रकुमार वांद्रय़ाच्या कार्टर रोडला डिंपल बंगल्यात भाडेकरू म्हणून राहत होते. नंतर ते पाली हिलवर स्वत:च्या बंगल्यात राहायला गेले. ‘आराधना’ चित्रपटाने अपूर्व यश मिळविल्यावर राजेश खन्नाने हा डिंपल बंगला विकत घेऊन त्याचे नामकरण ‘आशीर्वाद’ केले. या जागेचा नक्कीच काहीतरी पायगुण असावा. केवळ दहा वर्षांच्या कारकीर्दीत राजेंद्रकुमारचे जवळजवळ पंचवीस चित्रपट हिट झाले.
१९६९ मध्ये शक्ती सामंतांचा ‘आराधना’ प्रदर्शित झाला. दार्जिलिंगचे नयनमनोहर निसर्गसौंदर्य रानावनातून नागमोडी वळणे घेत सरपटत जाणारी मिनी ट्रेन राजेश खन्ना, शर्मिला टागोरची उत्तेजक प्रणयदृश्ये आणि तरुणाईला साद घालणारे जोशीले संगीत! ‘आराधना’चे संगीतकार सचिनदेव बर्मन असले तरी ती सांगीतिक करामत फक्त दोन गुणी वादक कलाकारांची होती. केरसी लॉर्ड आणि मनोहरी सिंग! ‘आराधना’ मधील ‘रूप तेरा मस्ताना’ आणि ‘मेरे सपनो की रानी’ या गाण्यातील त्यांची अॅकॉर्डियन आणि सॅक्सोफोनची अप्रतिम जुगलबंदी कधीही विसरता येणार नाही. याच चित्रपटात किशोरकुमारने कात टाकून एक नवीन रोमॅण्टिक रूप धारण केले. ‘आराधना’मुळे राजेश खन्ना व किशोरकुमार दोघांचे ही नशीब फळफळले. ‘आराधना’ जबरदस्त हीट झाला. गुलशन नंदाच्या ‘कटी पतंग’ कादंबरीवर आधारित, शक्ती सामंतानी ‘कटी पतंग’ चित्रपटाची निर्मिती केली. कथा नायिका प्रधान असली तरी तो राजेश खन्नाचा चित्रपट म्हणूनच ओळखला गेला. ‘खामोशी’ (१९६८) मध्ये राजेश खन्नाच्या अभिनयाचा एक वेगळा पलू पाहायला मिळतो. तो (राजेश खन्ना) वेडा असतो आणि ती नर्स (वहिदा रहेमान) त्या वेडय़ाला बरे करण्याच्या प्रयत्नात स्वत वेडी होते. ती वेडी झाली म्हणून हा तिला सोडून जात नाही. तिच्यासाठी तो थांबतो. तिचा स्वीकार करतो. प्रेक्षकांना राजेश खन्नाची ही सकारात्मक भूमिकाही आवडली. त्यातील ‘वो शाम कुछ अजीब थी’ गाण्यात किशोर कुमारनी अक्षरशः जीव ओतला आहे आणि राजेश खन्नानी आपल्या सर्वागसुंदर अभिनयाने तो प्रसंग जिवंत केला आहे.
मनमोहन देसाईच्या ‘सच्चा झूठा’ चित्रपटात ‘दिल सच्चा और चेहरा झूठा’ गाण्यात मानेला आणि हाताला असा काही हळूवार झटका देतो की त्याच्याकडे पाहात बसावे. ‘मेरी प्यारी बहनीया’ गाणे पाहताना, आपल्यालाही असा एक प्रेमळ भाऊ असावा अशी स्त्रियांच्या मनात उर्मी दाटून येत असे. ‘सफर’ हा त्याचा एक उल्लेखनीय चित्रपट होता. ‘सफर’मध्ये तो सहजगत्या तत्त्वज्ञान सांगून जातो.
हृषिकेश मुखर्जीचा ‘आनंद’ म्हणजे राजेश खन्नाच्या अभिनय कलेचा परमोच्च बिंदू होता. त्याचे केविलवाणे खिन्न हास्य ‘देवदास’मधील सहगलची आठवण करून देते. ‘आनंद’ मधील त्यांचा अमेझिंग परफॉर्मन्स पाहताना ‘दर्द का बादशहा’ दिलीप कुमारचाही विसर पडतो. ‘आनंद’मध्ये नायिका नव्हती. सगळा फोकस फक्त राजेश खन्नावर होता. स्वत हसता हसता दुसऱ्याला रडविणे ही अभिनयकला राजेश खन्नाला चांगली अवगत होती. कॅमेऱ्याकडे बघून क्लोजअप घेऊन रडणारे कलाकार आपल्याकडे फारच कमी आहेत. प्रेमाने आणि प्रेमाखातर रडणारा फक्त एकच कलाकार मी पाहिला आणि तो म्हणजे राजेश खन्ना! त्यातील अमिताभ बच्चन, जॉनी वॉकर, ललिता पवार, रमेश देव, सीमा यांच्या भूमिकाही दृष्ट लागण्यासारख्या झाल्या आहेत. लोकांचे त्यांच्यावर उदंड प्रेम असते. सिनेमा पाहताना आनंद (राजेश खन्ना) मरणार ही कल्पनाही प्रेक्षकांना सहन होत नाही. कमर्शियल सिनेमाच्या जमान्यात अशी शोकांतिका फक्त राजेश खन्ना आणि डायरेक्टर हृषिकेश मुखर्जीच यशस्वीपणे दाखवू शकतात. सिनेप्रेक्षक वेगवेगळ्या कारणांसाठी चित्रपट पाहायला येतात. पण सहगलचा देवदास, माहेरची साडी आणि आनंद असे मोजकेच चित्रपट आहेत, की जे पडद्यावर पाहत, रडण्यासाठी रोज हजारो प्रेक्षक येत.
‘अमरप्रेम’मधील त्याची बंगाली बाबूची भूमिका पाहताना अस्सल बंगालीसुद्धा लाजले असतील! त्यातील ‘कुछ तो लोग कहेंगे’ गाण्यातील प्रसंग पाहताना नकळत रामायणातील रामाने सीतेचा त्याग केल्याचा प्रसंग आठवतो. ‘रैना बीती जाए’ गाण्याचा आलाप सुरू होतो. दारुच्या नशेत बेहोश होऊन टांग्यांतून तो तिथून जात असतो. ते करूण आलाप कानावर पडताच टांग्यातून उतरून, लडखडत त्या आवाजाच्या शोधार्थ जाऊ लागतो. असा क्लासिक शॉट चित्रपटात क्वचितच पाहायला मिळतो. ‘ये आंसू बाहर कैसे आ गये’ हा संवाद त्याच्याच तोंडी शोभतो. पुष्पाला (शर्मिला टागोर) समजावताना तो म्हणतो ‘लो फिर तुम्हारे आंखों में पानी, मंने तुमसे कितनी बार कहा है की पुष्पा मुझसे ये आंसू नहीं देखे जाते, आय हेट टिअर्स!’ त्याचे हे असे भावप्रधान संवाद पिक्चर संपला तरी आपला पिच्छा सोडत नाहीत. डायलॉग (संवाद) राजेशसाठी कधीच नव्हते, त्याच्या मुखातून बाहेर पडलेली प्रत्येक लाईन डायलॉगमध्ये बदलत असे. ‘बावर्ची’मध्ये साधा आचारी सहजगत्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून जातो. ‘खूश रहना एक सीधीसाधी बात है, लेकिन सीधासाधा रहना बहुत मुश्किल है’ त्याचा ‘धनवान’ चित्रपट प्रदíशत झाला तेव्हा एका वृत्तपत्रात जाहिरात होती, ‘नो प्रॉब्लेम. धनवान इज इन टाऊन!’ ‘रेड रोज’ मध्ये प्रेमाचा अतिरेक होतो. त्याला जेव्हा दगा देण्यात येतो तेव्हा त्याचा तो कुठे तरी खुन्नस काढतो. ‘रोटी’ (१९७४) मध्ये ‘जिसने गुनाह नहीं किया हो वो हमे पत्थर मार सकते है’ म्हणत येशूची आठवण करून देतो. त्याने प्रत्येक चित्रपटात काहीतरी वैशिष्टय़ जपले.
वाढता स्टारडम
सुरांचा जादूगार कुंदनलाल सगल हा त्या काळातला दुसरा नावाजलेला स्टार! इंडियन डग्लस विठ्ठलनी सुरू केलेली हजाराची भाषा अशोककुमारने लाखाच्या घरात नेली. त्यानंतर ‘दर्द का बादशहा’ दिलीपकुमार, ‘सपनों का सौदागर’ राज कपूर, चॉकलेट हिरो देव आनंद यांच्या काळात ती वाढत वाढत पंधरा-वीस लाखांच्या घरात पोहोचली. दोन दशके या अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. यशाची धुंदी त्यांनाही बाधली व नंतर त्यांचीही उतरती कळा सुरू झाली.
त्याचे ‘अंदाज,’ ‘आन मिलो सजना’, ‘हाथी मेरे साथी’, दुश्मन’, ‘मेरे जीवनसाथी’, दाग’, ‘नमकहराम’, ‘आप की कसम’ आदी चित्रपट एका मागून एक हीट होत गेले. म्हणता म्हणता राजेश खन्ना यशाच्या अत्युच्य शिखरावर पोचला. त्याची लोकप्रियता कल्पनातीत होती. राजेश खन्नाच्या प्रतिमेवर फिदा झालेल्या तरुणी त्याच्या आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर उन्हातान्हात उभ्या राहून त्याच्या नुसत्या दर्शनासाठी जीव टाकायच्या. अनेकींनी त्यांच्या फोटोशीच लग्न लावले. काहींनी स्वतच्या रक्ताने त्याला पत्र लिहिली. चॉकलेट हिरो देव आनंदची जागा त्याने घेतली होती. एकेकाळी राजेश खन्ना म्हणजे डर्बी रेसचा फेव्हरीट घोडा होता. ज्या कुणी त्याच्या चित्रपटात पसे गुंतविले त्या सर्वाना त्याने दामदुपटीने पैसे वसूल करून दिले. राजेश खन्ना आता सुपरस्टार पदाला पोचला होता. फिल्मी उद्योगात सर्वाधिक बिदागी घेणारा कलाकार झाला होता. राजेश खन्ना वन मॅन आर्मी होता. आनंद म्हणजे फक्त शोकांतिका होती. त्यात नायिकाही नव्हती. तरीही तो जबरदस्त हीट झाला. .
अमिताभ अॅग्री यंग मॅन म्हणून ओळखला जायचा तर काकाने मृत्यूचे उदात्तीकरण केले, वेश्येवर सात्त्विक प्रेम कसे करावे ते शिकवले. प्रेयसीला समजून घेणारा, हळूवारपणे तिच्या भावना जपणारा तो नायक होता. काकाने विविध प्रकारचे रोल केले. ‘धनवान’ मध्ये त्याने श्रीमंतीची मिजासही दाखवली. इतर नायक सूटबुटात वावरले, तेव्हा काका साध्या गुरू कुडत्यावर चित्रपट घेऊन गेला. सामान्यांना तो आपला नायक वाटला. श्रीमंतीही त्याने अत्यंत साधेपणाने झळकवली. त्यांच्या अंगावरची रेशमी शाल जमिनीवर ओसंडत जायची. त्याला दागदागिने, भरजरी कपडेलत्ते कशाचीच गरज नव्हती. सशक्त अभिनय हाच त्याचा खरा दागिना होता.
राजेश खन्नामुळे गुरू शर्ट इतका लोकप्रिय झाला की लोक पंचतारांकित हॉटेलातही गुरू शर्ट घालून जाऊ लागले. त्या काळात बहुतेक नटांचा भांग एका बाजूला असे. याने मधून भांग पाडायची प्रथा सुरू केली आणि ती कित्येक वर्षे सुरुच होती.
काकाच्या आधी राज, दिलीप, देव आनंद, अशोक कुमार यांचा जमाना होता. ते वयाने व अनुभवाने जेष्ठ होते. राजेश खन्ना या सर्वापेक्षा वयाने लहान होता. पंजाबी लोक लहान मुलांना प्रेमाने ‘काके’ म्हणतात. याच काकेचा पुढे काका झाला.
हा काका पुढे आपल्याच प्रतिमेत गुरफटला गेला. यशाच्या बेहोशीत स्वतच्या चित्रपटाच्या मुहुर्ताला उशिरा येऊ लागला. इतरांना तुच्छ लेखू लागला. अंजू महेद्रु, देवयानी चौबळ, किशोर कुमार, मुमताज, शर्मिला टागोर हे खरं तर त्याच्या पत्रिकेतील लकी स्टार! त्याच्यावर निव्र्याज प्रेम करणाऱ्या अंजूला त्याने कोसभर लांब ठेवले. देवयानीशी भांडला. मुमताज, शर्मिला विवाह करून संसाराला लागल्या. काका एकटा पडला. टीना मुनीम, स्मिता, विद्या सिन्हा आदी नवख्या नटय़ा त्याच्या तोडीच्या नव्हत्या. त्यातून ‘नमकहराम’मध्ये अमिताभ त्याला भारी पडला. त्याने केस वाढवायला सुरुवात केली. तेव्हा त्याचा चेहरा सुजलेला दिसू लागला. त्याचा स्वभाव हळूहळू चिडचिडा होऊ लागला.
त्यात १९७३ मध्ये डिंपल कपाडिया व ऋषी कपूरचा ‘बॉबी’ रिलीज झाला. टिनेजर रोमान्सचा एक नवीन जमाना सुरू झाला. बॉबीच्या भव्यदिव्य यशामुळे त्याचा इगो मनोमन दुखावला. त्यात परत ‘हमशक्ल’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘शहजादे’, मालिक’, ‘त्याग’ आदी चित्रपट एका मागून एक फ्लॉप होऊ लागले. काका भांबावला. त्याने अचानक डिंपल कपाडियाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. १७ वर्षांची डिंपल आणि ३४ वर्षांचा राजेश पती पत्नी झाले. काकाच्या चाहत्यांसाठी विशेषत त्याच्यावर जीव टाकणाऱ्या तरुणींसाठी हा जबरदस्त धक्का होता. अंजू महेद्रू निराश होऊन त्याला सोडून गेली. त्याच्याविषयी वेडय़ावाकडय़ा बातम्या प्रसृत होऊ लागल्या. राजेश अमिताभला घाबरतो, राजेश डिंपलचे पटत नाही इत्यादी. जनमानसातील त्याची प्रतिमा विस्कळीत झाली होती. आपल्या थोडय़ा विक्षिप्त आणि सणकीपणाने त्याने ती अधिकच बिघडवली. विवाहानंतर त्याचा कटी पतंग हळूहळू परत जमिनीवर येऊ लागला होता. डिंपलची कारकीर्द त्यात कोमेजून गेली. अमिताभ आपल्यापुढे निघून गेला हे शल्य त्याच्या उरी बोचत होतं.
पण म्हणतात ना! सुंभ जळले तरी त्याचा पीळ जळत नाही. आपले दिवस पुन्हा येणार या वेडय़ा आशेवर स्वप्नांच्या दुनियेत तो जगत होता. अधेमधे कार्टर रोडला, मेहबूब स्टुडिओच्या परिसरात तो दिसत होता. चेहरा ओढलेला, तणावग्रस्त! पण त्या चिमुकल्या डोळय़ांत एक वेगळी चमक, एक वेगळी आशा बाकी होती. अजूनही मी संपलेलो नाही, माझा जमाना परत येणार आहे. पण अचानक १८ जुलै २०१२ ला काका गेला. दिवसभर टीव्ही चालू होता. काकाची अंत्ययात्रा जात होती तेव्हा अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. त्यांच्या दृष्टीने तो एक आदर्श प्रियकर होता. पती, भाऊ, बापही होता. काकाने आयुष्यभर हसत हसत रडविले आणि जाताना हा असा चटका लावून गेला..’ एका सुपरस्टारचे पर्व संपले होते.
– योगेश शुक्ला फेसबुक वॉलवरून

Previous Post

बादोल्याचे जानकर बंधुचे नीट परीक्षेत घवघवीत यश

Next Post

समाजवादाच्या उत्तर आकाशातील सप्तर्षी पर्व अंतर्धान

Admin

Admin

Next Post
समाजवादाच्या उत्तर आकाशातील सप्तर्षी पर्व अंतर्धान

समाजवादाच्या उत्तर आकाशातील सप्तर्षी पर्व अंतर्धान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697