सामाजिक

अक्कलकोट तालुक्यात ओबीसी , एससी मूळ लाभार्थ्यांवर संक्रांत !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात ओबीसी आणि एससी प्रवर्गातून अनेकांनी बोगस जातीचे दाखले काढल्याने मूळ ओबीसी आणि एसी प्रवर्गातील लाभार्थ्यांवर संक्रांत आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोगस जातींच्या दाखल्यांची सखोल चौकशीची मागणी एससी आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांतून केली जात आहे.
 अक्कलकोट तालुक्यात एससी (अनुसूचित जाती ) आणि ओबीसी प्रवर्गातून अनेक जणानी खोटी कागदपत्रे देऊन कर्नाटकातील जातींचा आधार घेऊन बोगस जातींचे दाखले काढले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका ,पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक नेत्यांनी एससी आणि ओबीसी प्रवर्गातील बोगस जातींच्या दाखल्यांच्या आधारे निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यात बोगस जातींच्या दाखल्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. प्रशासकीय यंत्रणांच्या दिरंगाईमुळे तसेच प्रशासनाची कारवाई होत नसल्याने बोगस जातींचे दाखले मिळवणाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. बोगस जातीच्या दाखल्यामुळे मूळ ओबीसी आणि एससी प्रवर्गातील लाभार्थ्यांवर राजकीय , सामाजिक अन्याय होत आहे. राजकीय क्षेत्रात बोगस जातींचे दाखले घेऊन अनेक नेतेमंडळी हे निवडणुकीत विजयी होत आहेत. याचा फटका हा मूळ लाभार्थ्यांना बसत आहे .तसेच विविध शासकीय नोकरी , शैक्षणिक सवलती या बोगस जातीचे दाखले मिळवणारे मोठ्या प्रमाणात घेत आहेत. एका माजी खासदारांनी ही बोगस जातीच्या दाखल्या आधारे खासदारकी भोगल्याचे प्रकरण चर्चेत असताना आता अनेक नेत्यांनी ओबीसी आणि एससी प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले काढून ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद , नगरपालिका निवडणुकीत उभे राहण्याचा पराक्रम केला आहे. अक्कलकोट तालुक्यात बोगस जातीचे दाखले देणारी टोळी सक्रिय झाली असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. एससी आणि ओबीसी प्रवर्गातील बोगस जातीच्या आधारे लाभ घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील नागरिकांबद्दल मूळ लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन अशा सर्व नेत्यांच्या बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.अक्कलकोट तालुक्यातील बोगस जातीचे रॅकेट उध्वस्त होणार का ? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. बोगस जातीचे दाखले देणारे उजळ माथ्याने सर्वत्र फिरत असून तेच लाभ घेत असल्याने मूळ लाभार्थी मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे .अक्कलकोट तालुक्यातील ओबीसी आणि एससी प्रवर्गातील विविध संघटना यावर आवाज उठविण्यात असमर्थ ठरल्याने बोगस जातींचे दाखले घेणारे मात्र मजा घेत आहेत. एससी प्रवर्गात विशिष्ट संघटना आणि पक्षच रस्त्यावर उतरून निवेदन देत आहेत आंदोलन करत आहेत. एस सी मधील अनेक जातीच्या संघटना या बोगस जातीच्या दाखल्या प्रकरणी संविधानिक मार्गाने आवाज उठवण्यासाठी एकत्र येत नसल्याचे चित्र दिसत आहे. बोगस जातीच्या दाखल्याचे प्रमाण हे जर असेच वाढत राहिले तर मूळ लाभार्थी हे राजकीय आणि सामाजिक शैक्षणिक , शासकीय हक्कांपासून दूर फेकले जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ओबीसी आणि एस.सी प्रवर्गातील विविध संघटनांनी एकत्र येऊन बोगस जातीच्या दाखल्या विरोधात संयुक्त आंदोलन उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ ओबीसी आणि एससी प्रवर्गातील बोगस जातीच्या दाखल्यांच्या तक्रारींची प्रकरणे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई केल्यास बोगस जातीच्या दाखल्यांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button