सांस्कृतिक
पं.भिमण्णा जाधव यांच्या सांगीतिक प्रवासावर विशेष चित्रफीत

प्रेमात पाडणारी सोलापूरची ‘सुंद्री’!
सोलापूर ( प्रतिनिधी ): महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा समृद्ध करणाऱ्या आणि काळाच्या ओघात दुर्मीळ होत चाललेल्या सुंद्री या वाद्याची ओळख आता चित्रफितीच्या माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचणार आहे. सिनेमा सृष्टीतील मान्यवर कलाकार व दिग्दर्शक श्री. संदीप पाठक यांनी सुंद्रीवादक पं.भिमण्णा जाधव यांच्या सांगीतिक जीवनप्रवासावर आधारित ‘प्रेमात पाडणारी सोलापूरची सुंद्री’ ही विशेष चित्रफीत तयार केली आहे.
सुंद्री हे भारतीय संगीतविश्वातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ वाद्य आहे. जाधव परिवाराने गेल्या चार पिढ्यांपासून या वाद्याची परंपरा जपली असून त्याच्या जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पं.भिमण्णा जाधव यांनी आपल्या वादनकलेच्या माध्यमातून सुंद्री वाद्याला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या सांगीतिक वारशाची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांचे सुपुत्र मास्टर व्यंकटेशकुमार जाधव आणि कन्या कलाश्री जाधव हे देखील सुंद्री वादनाचे प्रशिक्षण घेत असून संगीतक्षेत्रात आपली कला सादर करीत आहेत. विशेष म्हणजे, पुढील पिढीपर्यंत या दुर्मीळ वाद्यकलेचा वारसा पोहोचविण्याचे कार्य जाधव परिवाराकडून सुरू आहे.
या चित्रफितीमध्ये पं.भिमण्णा जाधव यांचा सांगीतिक प्रवास, सुंद्री वाद्याचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, जाधव परिवाराची चार पिढ्यांची सांगीतिक परंपरा आणि या कलेमागील साधना यांना स्थान देण्यात आले आहे.
एका कलाकाराच्या जीवनप्रवासासोबतच दुर्मीळ भारतीय वाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारा हा प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. संदीप पाठक यांनी या कलेची दखल घेऊन चित्रफितीच्या माध्यमातून सुंद्री वाद्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.



