धार्मिक

जय जय स्वामी समर्थ मालिकेचे २००० भाग पूर्ण 

 
अभिनेते सुनील गोडसेंनी अक्कलकोट येथे घेतले स्वामींचे दर्शन
अक्कलकोट (प्रतिनिधी) कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच २००० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे.गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत.स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला,त्यांच्या भक्तांना आलेल्या प्रचिती आणि भक्तांच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारिक अनुभवांचा प्रवास या मालिकेतून सातत्याने उलगडत आहे.या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील गोडसे यांनी अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.स्वामींच्या पवित्र भूमीत हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करताना त्यांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि या यशामागे असलेल्या प्रेक्षकांच्या प्रेमाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी सुनील गोडसे म्हणाले,‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचे २००० भाग पूर्ण होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे.गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांनी या मालिकेवर आणि स्वामींच्या भूमिकेवर जे प्रेम केले,तो स्वामींचाच आशीर्वाद आहे, असे मी मानतो.स्वामींच्या लीला,त्यांनी भक्तांना दिलेली प्रचिती आणि त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभव साकारताना मला दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते.स्वामींनी अनेक भक्तांना अनेक रूपांत दर्शन दिले आहे.त्यांच्या या अगाध महिम्याचा आणि भक्तीचा प्रवास मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे.अक्कलकोटच्या पवित्र भूमीत महाआरती आणि महाप्रसादाच्या माध्यमातून हा आनंद साजरा करता आला,यापेक्षा मोठे समाधान नाही.यापुढेही स्वामींची सेवा अशीच घडत राहो,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना ! २००० भागांचा हा टप्पा म्हणजे केवळ मालिकेचे यश नसून स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा,भक्ती आणि प्रेक्षकांच्या अतूट प्रेमाचा उत्सव आहे.स्वामींच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा हा भक्तिमय प्रवास असाच अविरत सुरू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button