सामाजिक

सोलापुरात आस्था रोटी बँकेचा माणुसकीचा दीपोत्सव

१,४०० वंचितांच्या आयुष्यात फुलविला दिवाळीचा आनंद; भिक्षुकांना अभ्यंगस्नान, निराधारांना साड्या, अनाथ मुलांना नवीन कपडे व फराळाचे वाटप
सोलापूर ( प्रतिनिधी ) : दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, आनंदाचा सण, नव्या कपड्यांचा आणि गोडधोड फराळाचा सण! मात्र, आपल्या समाजात असेही अनेक लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद कधी पोहोचतच नाही. कुणाच्या अंगावर नवीन कपडे नसतात, कुणाला सणाचा फराळ मिळत नाही, तर कुणाच्या आयुष्यात आपुलकीचे दोन शब्द बोलणारेही कोणी नसते. अशाच वंचित, निराधार आणि गरजू बांधवांच्या आयुष्यात आनंदाची ज्योत पेटविण्याचे हृदयस्पर्शी कार्य आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले. ‘यंदाची दिवाळी… माणुसकीची दिवाळी!’ या संकल्पनेतून तब्बल १,४०० गरजू व्यक्तींना साड्या, नवीन कपडे, ड्रेस आणि दिवाळी फराळाचे वाटप करून माणुसकीचा अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दिवाळीच्या आनंदात समाजातील एकही वंचित घटक मागे राहू नये, या भावनेतून गोरगरीब, गरजू, अंध, अपंग, निराधार, कुष्ठरोग वसाहतीतील नागरिक, सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांचे नातेवाईक, झोपडपट्टीतील महिला व मुले, रस्त्यावर राहणारे भिक्षुक, वृद्धाश्रमातील आजी-आजोबा तसेच अनाथ आश्रमातील मुला-मुलींना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष पाटील, समाजसेवक गुरूशांत धूत्तगावकर, पत्रकार विक्रम खेलबुले (अध्यक्ष), उद्योगपती प्रकाशकुमार लालचंद बगरेच, उद्योजिका मीरा देसाई, मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊनच्या अध्यक्षा निशा प्रमोद होलानी, राजू हौशेट्टी, अॅड. अवधूत डावरे, कांचन हिरेमठ, अमित कांबळे आणि चंचला खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
भिक्षुकांना सन्मानाचे अभ्यंगस्नान; मानवी प्रतिष्ठेचा अनोखा उपक्रम!
कार्यक्रमाची सुरुवात रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुक बांधवांना सन्मानाने अभ्यंगस्नान घालून करण्यात आली. त्यांना सुगंधी उटणे, मोती साबण, सुगंधी तेल, टॉवेल, अंडरवेअर, बनियन आणि नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. आयुष्यात अनेकदा उपेक्षा आणि अवहेलना सहन करणाऱ्या या बांधवांना सन्मानाने स्नान घालून नवीन कपडे देण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करण्यात आले. अंध, अपंग, निराधार महिला आणि वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना साड्या व नवीन कपडे देण्यात आले. अनाथ आश्रमातील मुला-मुलींना तसेच झोपडपट्टीतील गरजू बालकांना नवीन ड्रेस आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
श्रीमंती पैशात नसते, तर दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या मनात असते असे – डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले.
यावेळी शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी आस्था रोटी बँकेच्या सेवाकार्याचे मनापासून कौतुक केले. 
या सामाजिक उपक्रमास मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊन, सोलापूर, श्री मालक गणपती भुसार गल्ली, सोलापूर आणि श्री महादेव गणपती प्रतिष्ठान, सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी उदार मनाने मदतीचे हात पुढे केल्यामुळे तब्बल १,४०० गरजूंपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविणे शक्य झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आस्था रोटी बँकेच्या नीलिमा हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, अनिता तालीकोटी, संगीता छचुरे, विनोद भोसले, सत्यम सोलापूरकर, प्रकाश डोंगरे, अविनाश माचरला, सुरेखा पाटील, द्वारकाधीश क्षीरसागर, अंबादास पोतन, ज्योत्स्ना सोलापूरकर, शैलजा ससाणे, स्वप्न नवल काबरा, उर्मिला मधुसूदन बलदवा, नंदा लाहोटी, रश्मी लड्डा, नीता राठी, कोमल भट्टड, वंदना बजाज, रामा तापडिया, सरला जंवर आणि विजय छचुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले, आस्था रोटी बँकेच्या कार्याची माहिती शैलजा ससाणे यांनी दिली, तर आभार प्रदर्शन विनोद भोसले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button