सोलापूर

प्रवासी सेवा संघाच्या मागणीला मोठे यश; माढा ते, स्वारगेट (पुणे) एसटी बससेवा आजपासून सुरू

 

दिवाळी सणानिमित्त प्रायोगिक स्वरूपात बससेवा सुरू; भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून सेवा कायम सुरू ठेवण्याबाबत निर्णय

माढा (प्रतिनिधी) -माढा तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी सेवा संघाने केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला यश आले असून आजरोजीपासून माढा-कुर्डुवाडी-इंदापूर-स्वारगेट (पुणे) ही नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भागातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून कुर्डुवाडी आगाराच्या व्यवस्थापनाने ही बससेवा प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे.

माढा तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच; पुण्याला नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बससेवा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी पुणे प्रवासासाठी प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर व्हावी आणि, माढा परिसरातून पुण्याला थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रवासी सेवा संघाच्यावतीने एसटी महामंडळाकडे नवीन बसमार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

प्रवासी सेवा संघाच्या मागणीची दखल घेत कुर्डुवाडी आगाराने दिवाळी सणासाठी ही बससेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा केवळ दिवाळी सणाच्या कालावधीपुरती सुरू राहणार आहे. मात्र, भविष्यात ह्या बसला नियमितपणे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत राहिल्यास सदर बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा मानस कुर्डुवाडी आगार व्यवस्थापनाने इथे व्यक्त केला आहे.

त्यामुळे प्रवाशांनी सदर बससेवेचा जास्तीतजास्त लाभ घेवून एसटी महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास माढा-पुणे प्रवासासाठी ही बससेवा कायमस्वरूपी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होवू शकतो.

सोलापूर जिल्हा प्रवासी सेवा संघाच्या भक्कम पाठपुराव्याला मिळालेले हे यश असून आता ह्या बससेवेला येथील प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो यावर तिचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button