नागनहळळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना संस्थाचालकांकडून मिळाली मायेची ऊब !

दुष्काळाच्या संकटात
विद्यार्थ्यांच्या दिवाळीत गोडवा
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागत असताना, गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा प्रयत्न नागनहळळी येथील आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करून त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीची एक वेगळीच आनंदानुभूती मिळाली.
अक्कलकोट तालुक्यात दुष्काळाचे सावट असल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा वेळी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सणाच्या आनंदापासून दूर राहावे लागू नये, याची जाणीव ठेवून संस्थेने पुढाकार घेतला. विशेषतः भटक्या-विमुक्त समाजासह अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आनंदात त्यांच्या कुटुंबीयांनाही सहभागी करून घेण्यामागे संस्थेची आपुलकीची भावना दिसून आली. केवळ शैक्षणिक जबाबदारी पार न पाडता विद्यार्थ्यांच्या जीवनातील अशा छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांमध्येही सहभागी होण्याचा संस्थेचा प्रयत्न उल्लेखनीय ठरला.
संस्थेच्या वतीने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. वैयक्तिक आनंदाचे प्रसंग सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याची भूमिका संस्थेने जपली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशीलता जपण्याचा आदर्शही निर्माण होत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जावेद पटेल होते. यावेळी अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे, भाऊ कापसे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आय. एम. मुजावर उपस्थित होते. शंभूलिंग बशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. मनोज जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन गुरव यांनी आभार मानले.



