उजनी धरणावरील प्रस्तावित सात प्रकल्पांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

ए.आय. कॅम्पस, डाटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्पासह लघु अणुभट्टी प्रकल्पाला विरोध; परवेझ पठाण यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यात मोठे आंदोलन
करमाळा (प्रतिनिधी) -उजनी धरण परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या ए.आय. कॅम्पस, डाटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प, लघु नमुना अणुभट्टी, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि, बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्पांसह विविध प्रकल्पांच्या विरोधात युवक काँग्रेस संगठनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. युवक काँग्रेस संगठनेचे परवेझ पठाण यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथे आज रोजी एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी करमाळा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून येथील प्रस्तावित प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असून लाखो नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज आणि, हजारो शेतकऱ्यांची शेती ह्या धरणावर अवलंबून आहे. अशा महत्त्वाच्या जलस्रोताच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक, ऊर्जा आणि, तंत्रज्ञानविषयक प्रकल्प उभारण्याचे नियोजन करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.
ए.आय. कॅम्पस, डाटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन निर्मिती, लघु नमुना अणुभट्टी, तरंगता सौर ऊर्जा आणि, बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्प यांसारख्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावर, पर्यावरणीय संतुलनावर व, जलचर सृष्टीवर तसेच; स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि, नागरिकांच्या उपजीविकेवर नेमके काय परिणाम होणार आहेत याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी युवक काँग्रेस संगठनेने केली.
विकासाच्या नावाखाली उजनी धरण आणि, परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर कोणताही घाला घालू दिला जाणार नाही; प्रकल्पांचे सविस्तर परिणाम सार्वजनिक करावेत, पर्यावरणीय परिणामांचे मूल्यमापन करावे आणि, स्थानिक नागरिकांची संमती व हित लक्षात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली.
*उजनी धरण हा केवळ एक पाणीसाठा नसून सोलापूर जिल्ह्याच्या शेतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि, लोकजीवनाचा आधार आहे. त्यामुळे, उजनीच्या अस्तित्वाला आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांना बाधा पोहोचविणारा कोणताही निर्णय युवक काँग्रेस संगठना खपवून घेणार नाही. नागरिकांच्या हक्कांसाठी हा संघर्ष यापुढे अधिक तीव्र केला जाईल* असा गंभीर इशारा परवेझ पठाण यांनी यावेळी दिला.
सदरील आंदोलनामुळे उजनी धरणावरील प्रस्तावित प्रकल्पांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार न करता प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा निर्धार युवक काँग्रेस संगठनेने व्यक्त केला.



