अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी – किसान एकता संघ दिल्लीची मागणी
अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी किसान एकता संघ दिल्ली या संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी नायब तहसीलदार यांना देण्यात आले. किसान एकता संघ दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत रेवणसिद्ध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. दुधनी मंडल मधील खरीप पिकांचे पंचनामे करा. अक्कलकोट तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतीतील तूर , उडीद , सोयाबीन , मूग , कांदा, फळबागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुधनी मंडल मध्ये पंचनामे करण्यास विलंब होत असून या ठिकाणी पंचनामे सुरू करावेत. तलाठी , सर्कल यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी अशी मागणी किसान एकता संघाच्या वतीने करण्यात आली. अक्कलकोटचे नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी किसान एकता संघ दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील , तालुकाध्यक्ष रमेश वागे , उपाध्यक्ष नागेश कांबळे , शिवानंद नागणसुरे ,महिला अध्यक्ष ज्योती वगाले , उपाध्यक्ष राजशेखर मुलगे, अशोक ढगापूर , सरपंच चांद जमादार, उपसरपंच सिद्धलिंग आंदेवाडी , मुबारक नाईकवाडी , मल्लिकार्जुन पाटील आदी उपस्थित होते. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अन्यथा किसान एकता संघ दिल्ली संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.



