माढ्यात युवक काँग्रेसकडून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

माढा (प्रतिनिधी):
आज रोजी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेस कमिटी यांच्यावतीने जिल्ह्याच्या नेत्या खा.प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, सोलापूर जिल्हा प्रभारी प्राची ताकतोडे, सहप्रभारी पंकज पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष शाहुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली माढा येथे टीईटी पेपर फुटीच्या विरोधामध्ये युवक काँग्रेसने मा.तहसीलदार यांना एक निवेदन देवून जाहीर निषेध आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये गेल्या महिन्याभरापासून पेपर फुटी संदर्भात जो सावळा गोंधळ सुरू आहे याच्या विरोधात माढा तहसील कार्यालय येथे युवक काँग्रेस संगठनेच्या पदाधिकारी व, कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत निषेध नोंदवला. जोपर्यंत दादा भुसे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस संगठन शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सदर निवेदनाद्वारे युवक काँग्रेस संघटनेने देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चाललेल्या खेळखंडोबा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून केंद्र व राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे ह्या पेपरफुटीमुळे मोठे खच्चीकरण होत असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
युवक काँग्रेसच्या प्रमुख मागण्या आणि मुद्दे:
१. दोषींवर कडक कारवाई: नीट आणि टीईटी परीक्षांमधील पेपरफुटी तसेच गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: परीक्षांचा पारदर्शक कारभार सांभाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्रीय व राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.
३. विद्यार्थ्यांना न्याय: लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी करतात. अशा प्रकारच्या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा.
४. परीक्षा पद्धतीत पारदर्शकता: भविष्यात होणाऱ्या सर्व प्रवेश/स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराविना तसेच पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ठोस यंत्रणा उभारण्यात यावी.
यावेळी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराजे उर्फ अरविंद सज्जन जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने माढा तहसील कार्यालयात जाऊन महसूल सहाय्यक व संबंधित अधिकाऱ्यांकडे हे निवेदन सुपूर्द केले. प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, ओबीसी विभागाचे जिल्हा सरचिटणीस मोतिलाल सुतार, सज्जन रावडे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष रमेश रणदिवे, अनिल सोनार, युवक काँग्रेसचे जमीर सय्यद, नितीन शिंदे, किशोर जाधव, निलेश मुजमुले, रामचंद्र शिंदे, बालाजी मुजमुले, आदींसह अनेक पदाधिकारी आणि, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.



