सामाजिक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल महेश इंगळेंकडून भावपूर्ण श्रध्दांजली

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अजित दादा पवार या नावपेक्षा सगळीकडे दादा याच नावाने ओळखले जाणारे, परखड वाणी पण तितकीच मिश्कील टिप्पणी करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांचे आज विमान कोसळण्याच्या माध्यमातून दुःखद निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाले. स्तब्ध, निशब्द हे शब्द पचनी पडण्यास जड असले तरी काळाने ती कवेत घेतली आहेत याची प्रचिती आज उपमुख्यमंत्री कै.अजीत दादा पवार यांच्या आकस्मित निधनाने तमाम देशवासियांना आलेली आहे. त्यांच्यासह विमानात असलेल्या इतर सहा जणांनीही अपघातात जीव गमावला. अख्ख्या महाराष्ट्राला या दुर्दैवी घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री कै.अजीत दादा पवार यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील अनेक नागरिकांशी व सर्वपक्षीय नेते मंडळींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. कै.अजीत दादा पवार हे श्री स्वामी स्वामी समर्थांचेही निस्सीम भक्त होते. आपल्या जीवनात कै.अजीत दादा यांनी अनेक वेळा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्यासह भेटीचा योग आलेला असल्याने आजची ही दुर्दैवी बातमी ऐकून त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या गतकाळातील स्मृती ताज्या झाल्या आहेत.
दिवसाचे १६-१७ तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लीलया पेलणारे कै.अजित दादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारे सुर्यतेजोमय व्यक्तीमत्व. सातत्याने गेली ३ दशके महाराष्ट्र राज्याच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेल्या या दूरदृष्टीस आता आपण सारे पोरके झाले आहोत.
महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले कै. अजित दादा हे नवमहाराष्ट्राचे शिल्पकार होते हेच त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची कालांतराने प्रचिती येईलच, परंतू त्यांनी आपल्या कर्तुत्वातून जे आदर्श आजच्या राजकीय नेते मंडळींसह सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवले आहेत ते प्रेरणास्रोत समजून भविष्यात अनेक वर्षांपर्यंत ऐकले आणि ऐकवले जातील असा मानस व्यक्त करतो. महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने पवार कुटुंबीयात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटात व जनसामान्यांच्या मनामनात जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे. शेवटी काळापुढे मनुष्य जीवन हतबल आहे. त्यांच्या दुःखद निधनाने पवार कुटुंबीयांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामध्ये पवार कुटुंबियांच्या दुःखात मी व्यक्तीश: तसेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे पदाधिकारी, सेवेकरी व सर्व मित्रपरिवार सदस्य सहभागी आहोत. पवार कुटुंबीयांवर आकस्मित कोसळलेल्या या दुःखाच्या खाईतून लवकरात लवकर सावरण्याचे बळ श्री स्वामी समर्थांनी कै. अजीत दादा पवार कुटुंबीयांना द्यावे अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून कै. अजित दादा पवार यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी भावपूर्ण श्रद्धांजली महेश क. इंगळे , चेअरमन
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान
अक्कलकोट, विद्यमान नगरसेवक
नगरपरिषद अक्कलकोट यांनी वाहिली आहे.




