सोलापूर

देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘गजनी’ ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सोलापुरात आरोप

 

सोलापूर शहराच्या विकासासाठी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

सोलापूर : ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सोलापूर महानगरपालिका निवडणूक संदर्भात सोलापूर दौऱ्यावर येत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप सैराट झाला असून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. “पैसा फेका, तमाशा दाखवा आणि निवडणूक जिंका” हेच सध्या भाजपचे राजकारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सपकाळ म्हणाले की, महापालिका निवडणूक ही मूलभूत सुविधा आणि शहराच्या विकासावर होणे अपेक्षित असते. मात्र सत्ताधारी विकासावर बोलायला तयार नाहीत. पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, बागा, परिवहन, पार्किंग अशा नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना बाजूला सारून धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात आहे. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये गाव-गाड्यांचा, लोकशाही मूल्यांचा सन्मान होता; काँग्रेसने सत्तेचे विकेंद्रीकरण करून अधिकार जनतेपर्यंत पोहोचवले, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले की, त्यांच्यात प्रचंड अहंकार असून ते बुलडोझरच्या राजकारणातून सत्ता, पैसा आणि शासकीय यंत्रणा वापरून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सोलापूर, अकोट आणि खोपोली येथे निवडणूक प्रक्रियेदरम्यान खून झाल्याच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी चिंता व्यक्त केली. भाजपकडून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराशी संबंधित तसेच महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांतील व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत, हे राजकारण भयावह असल्याचे ते म्हणाले.
सोलापूर स्मार्ट सिटीच्या दाव्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “दुर्बिणीतूनही सोलापूरचा स्मार्टपणा दिसत नाही. प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री येथे येऊन पुन्हा जुन्याच आश्वासनांची पुनरावृत्ती करतात, म्हणून आम्ही त्यांना ‘गजनी’ म्हणतो,” अशी टीका त्यांनी केली. पाणीटंचाई, खराब रस्ते, कामगारांसाठी योजना, उद्योगवाढ, बोरामणी विमानतळ यांसारख्या प्रश्नांवर दहा वर्षांत काहीही ठोस काम झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेस या योजनेच्या विरोधात नाही. मात्र निवडणुकीआधी अनेक महिने पैसे रोखून धरून मतदानाच्या अगदी तोंडावर रक्कम देणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. आम्ही तर या योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याची मागणी करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर हे कष्टकऱ्यांचे शहर असून “विविधतेत एकता” हीच त्याची खरी ओळख आहे. ध्रुवीकरणाच्या राजकारणाला नकार देऊन सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
ही पत्रकार परिषद हॉटेल बालाजी सरोवर येथे पार पडली.

त्यानंतर सपकाळ यांनी काँग्रेस–महाविकास आघाडीच्या प्रभाग १६ मधील उमेदवार नरसिंह आसादे, बिलकिसबानो दफेदार, सीमा यलगुलवार, नरसिंग कोळी तसेच प्रभाग २१ मधील उमेदवार अनुराधा काटकर, नुसरत शेख, सिद्धार्थ रणधिरे, अझरुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत सहभाग घेतला.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस–महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या पदयात्रेत हजारो नागरिक मतदार सहभागी झाले होते.

यानंतर ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. पंचकमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, काँग्रेस प्रवक्ते अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर, उदय चाकोते, अ‍ॅड. केशव इंगळे, तिरुपती परकीपंडला, राहुल वर्धा, सुरेश हावळे, पशुपति माशाळ, शकील मौलवी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button