करमाळ्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात हालचाल रजिस्टर नसल्याप्रकरणी कारवाईचे उपसंचालकाचे आदेश

करमाळा: ( प्रतिनिधी )
करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तब्बल वर्षभर हालचाल रजिस्टर ठेवले नसल्याचे सिद्ध झाल्याने त्या विरोधात तक्रार प्राप्त होताच पुणे प्रदेश, भूमि अभिलेख कार्यालयाचे उपसंचालक विष्णु शिंदे यांनी जिल्हा आधिक्षक ,भूमी अभिलेख, सोलापूर यांना याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे व अहवाल देण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत ह्यूमन राइट चे अध्यक्ष आयुब मुसा शेख यांनी तक्रार दाखल केली होती.
भुमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ असल्याने त्यांनी ३१ डिसेंबर २४ रोजी माहिती अधिकारामधून या कार्यालयाच्या हालचाल रजिस्टर व लॉक बुकची मागणी केली होती मात्र त्यातून काहीही निष्पन न झाल्याने त्यांनी पुन्हा या विरोधात २९ एप्रिल २५ रोजी अपील दाखल केले होते. याबाबत १ जानेवारी २४ ते ३१ डिसेंबर २४ पर्यंत हालचाल रजिस्टरच नसल्याचे व वाहन नसल्याने लॉक बुक ची सुविधा ठेवण्यात आलेली नसल्याचे करमाळा भूमी अभिलेख कार्यालयाने लेखी कळवले होते. त्यामुळे आयुब शेख यांनी १ जानेवारी २४ ते ३१ डिसेंबर २४ या कालावधीत हालचाल रजिस्टर ची नोंद या भूमी अभिलेख कार्यालयात न ठेवण्यात आल्याने शासनाच्या हालचाल रजिस्टर ठेवण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार उपसंचालक भूमी अभिलेख पुणे व जमााबंदी आयुक्त पुणे या वरिष्ठ कार्यालयात ११ नोव्हेंबर २५ रोजी केली होती.त्यात करमाळा भूमी अभिलेख कार्यालयाने हालचाल रजिस्टर न ठेवल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची खाते निहाय गैरकारभाराची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिलेख कार्यालय, पुणे चे कार्यालयीन अधीक्षक राहुल तुळशीराम पाटील यांनी २३ जुलै २५ रोजी उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांना या कारवाईबाबत पुढील आवश्यक कारवाई करून अर्जदारांना कळवुन अहवाल देण्याचे सांगितले होते. त्यामुळे १८ नोव्हेंबर २५ रोजी उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाने जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख सोलापूर यांना करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात हालचाल रजिस्टर न ठेवल्याच्या प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करावी व त्याचा अहवाल देण्याची कळवले आहे. त्यामुळे करमाळ्यातील भूमी अभिलेख कार्यालयात होत असलेल्या तक्रारीचा पाढा आता उघड होत चाललेला आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चौकट –
करमाळ्यातील भूमी अभिलेख कार्यालयात रजिस्टर न ठेवता शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे चौकशी करून दोशीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर १८ नोव्हेंबर २५ रोजी उपसंचालक पुणे यांनी जिल्हा अधीक्षक सोलापूर यांना चौकशी व कार्यवाही करण्यास आदेशित केले होते मात्र अद्याप पर्यंत महिना उलटून गेला तरी कसलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे.
.. आयुब शेख अध्यक्ष, हुमन राईट, करमाळा



