विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्याची सामूहिक जबाबदारी – प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे

विजयस्तंभ : शौर्य, समता आणि बंधुतेचा जागर शांततेत पार पाडण्याचा संकल्प
पुणे – भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ, जिथे शौर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाचा इतिहास कोरला गेला आहे, त्या पवित्र स्थळी १ जानेवारी रोजी अभिवादनासाठी देशभरातून लाखो अनुयायी एकवटतात.
या महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रत्यक्ष विजयस्तंभ परिसरात उपस्थित राहून तयारीची पाहणी करत प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिलेत.
समाज कल्याण विभागाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या प्रधान सचिवांनी स्वतः मैदानात उतरून शौर्यदिनाच्या नियोजनाचा सखोल आढावा घेतल्याची ही ऐतिहासिक घटना ठरली.
डॉ. कांबळे यांनी जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, बार्टी संस्था व विविध यंत्रणांशी सविस्तर चर्चा करून क्षणाचाही विलंब न करता १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्यासंदर्भातील शासन निर्णय त्याच दिवशी दुपारी निर्गमित केला. हे त्यांच्या संवेदनशील व कार्यक्षम नेतृत्वाचे ठळक उदाहरण ठरले.या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सेवाभावी संस्थांशी संवाद साधताना डॉ. कांबळे यांनी प्रेरणादायी शब्दांत नियोजनाबद्दल उपस्थितांना सांगितले.“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुतेचे मूल्य जपून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्रितपणे समन्वय साधून हा ऐतिहासिक सोहळा शांततेत व सन्मानाने पार पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या या भूमिकेमुळे भीमा कोरेगावचा शौर्यदिन सोहळा केवळ कार्यक्रम न राहता संविधानाच्या मूल्यांचा जिवंत उत्सव ठरत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.



