शैक्षणिक
भिम छावा संघटनेचे शावरस सिध्द हायस्कूल आंचेगाव या शाळेचा अनागोंदी कारभाराच्या विरोधात सोलापूर शिक्षण विभागावर निदर्शने

सोलापूर ( रमेश सुरवसे )श्री शावरसिद्ध हायस्कूल, आंचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे कार्यरत असलेले सहशिक्षक कै. अर्जुन गोतसुर्वे यांचे दिनांक २८ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात वारसदार विद्यासागर गोतसुर्वे यांनी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी शाळा व्यवस्थापन व शिक्षण विभाग, सोलापूर यांच्याकडे वेळोवेळी निवेदने सादर केली होती. शिक्षण विभागाने शाळेला संबंधित प्रस्ताव त्वरित पाठवून नियुक्ती करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही, शाळा व्यवस्थापनकडून नियुक्तीत टाळाटाळ केली जात आहे.
या अन्यायकारक व उदासीन धोरणाविरोधात भिम छावा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष . शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
या आंदोलनाला विविध संघटनांचा व व्यक्तींचा जोरदार पाठिंबा मिळाला. यामध्ये दलित ट्रॅक्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष घनश्याम भोसले, भीमशक्तीचे अध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, शिक्षक नेते डि.के. साखरे यांचा प्रमुख सहभाग होता. आंदोलनाचे आयोजन भिम छावा संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी केले होते.
यावेळी नरेश मांडूणूर, सचिन गायकवाड, अमोल शिंदे, अनिकेत पालखे, प्रशांत कांबळे, अरुण बनसोडे, संघभूषण साखरे, विशाल कांबळे तसेच गोतसुर्वे कुटुंबीय उपस्थित होते.
शिक्षण विभाग सोलापूर यांच्याकडून या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देत लेखी आश्वासन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर आंदोलन पुढील दहा दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
जर पुढील कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा भिम छावा संघटनेने दिला आहे.