माढा-कुर्डूवाडी विभागातील प्रवाशांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा; नवीन बसफेऱ्यांसाठी प्रवासी सेवा संघाचा पाठपुरावा

माढा, वैराग, तुळजापूर, पुणे आणि, सोलापूर मार्गावरील बससेवा विस्तारित करण्यासह ११ प्रमुख मागण्यांवर आगार व्यवस्थापनासोबत सहविचार बैठक संपन्न
माढा (प्रतिनिधी) -माढा-कुर्डूवाडी विभागातील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करणे, नवीन बसफेऱ्या सुरू करणे, वर्तमान बससेवा विस्तारित करणे तसेच, शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करणे अशा विविध मागण्यांसंदर्भात प्रवासी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कुर्डूवाडी आगाराचे व्यवस्थापक रत्नाकर लाड यांच्यासमवेत सहविचार संवाद बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत प्रवाशांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
प्रवाशांना वेळेत आणि, सोयीस्कर बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी आगार पातळीवर नियोजन व अंमलबजावणी करण्यात येईल अशी भूमिका यावेळी आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड आणि आगाराचे वाहतूक निरीक्षक मंगेश दहिहंडे यांनी व्यक्त केली.
प्रवासी सेवा संघाच्या प्रमुख मागण्या
१. टेंभुर्णी-कुर्डूवाडी आणि, परांडा-कुर्डूवाडी बसफेऱ्यांचा विस्तार करावा
टेंभुर्णी-कुर्डूवाडी तसेच, परांडा-कुर्डूवाडी मार्गावरील सकाळच्या व संध्याकाळच्या बसफेऱ्यांचा माढा-वैराग इथपर्यंत विस्तार करावा.
२. कुर्डूवाडी-माढा ते, वैराग-तुळजापूर बससेवा सुरू करावी
कुर्डूवाडी येथून सकाळी ७.४५ वाजता आणि, दुपारी २ वाजता तुळजापूरकडे बस सुरू करावी. परतीच्या प्रवासासाठी तुळजापूर येथून सकाळी १०.४५ वाजता आणि, सायंकाळी ४.४५ वाजता वैराग-माढा मार्गे कुर्डूवाडीकडे बस सोडावी.
३. कुर्डूवाडी-माढा ते, अनगर-मोहोळ मुक्कामी बस सुरू करावी
कुर्डूवाडी येथून सायंकाळी ७.३० वाजता माढा-अनगर मार्गे मोहोळ येथे मुक्कामी जाणारी बस सुरू करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मोहोळ येथून कुर्डूवाडीकडे बस सोडावी. ह्या सुविधेमुळे सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसने कुर्डूवाडी येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
४. माढा आणि, वैराग येथून पुणे (स्वारगेट) बस सुरू करावी
माढा येथून सकाळी ८.१५ वाजता आणि, वैराग येथून दुपारी १२.३० वाजता पुणे (स्वारगेट) येथे जाणारी बससेवा सुरू करण्यात यावी.
५. कुर्डूवाडी-सोलापूर बससेवा सुरू करावी
कुर्डूवाडी येथून सकाळी ८ वाजता माढा-केवड-मानेगाव ते, नरखेड-डिकसळ-वडाळा मार्गे सोलापूरला जाणारी बस सुरू करावी.
६. वैराग-कुर्डूवाडी बस पुण्यापर्यंत विस्तारित करावी
वैराग येथून सकाळी ५.१५ वाजता सुटणारी वैराग-कुर्डूवाडी बस पुणे (स्वारगेट) इथपर्यंत विस्तारित करावी.
७. माढा-वाकाव बसफेरी केवड इथपर्यंत वाढवावी
माढा-वाकाव-माढा ह्या मार्गावरील बसफेऱ्या केवडपर्यंत विस्तारित कराव्यात जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होईल.
८. शिवजन्मभूमी बस माढामार्गे सुरू करावी
कुर्डूवाडी-पंढरपूर ते, पुणे-जुन्नर ह्या मार्गावरील ‘शिवजन्मभूमी’ बससेवा माढामार्गे चालविण्यात यावी.
९. स्वामी समर्थ दर्शनासाठी विशेष बस सुरू करावी
स्वामी समर्थ भक्तांच्या सोयीसाठी दर रविवारी कुर्डूवाडी येथून सकाळी ६.१५ वाजता दर्शन बस सुरू करावी.
१०. माढा बसस्थानकावर मूलभूत सुविधांची मागणी
माढा बसस्थानकावर एक अतिरिक्त वाहतूक नियंत्रक नियुक्त करावा. तसेच; मद्यपी व व्यसनी व्यक्तींकडून प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि, स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे.
११. शालेय वेळापत्रकानुसार बसफेऱ्यांचे नियोजन करावे
शाळांच्या निर्धारित वेळांनुसार शालेय बसफेऱ्यांचे नियोजन करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी वेळेवर वाहतूक सुविधा मिळेल.
मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आगार पातळीवर नियोजन
प्रवासी सेवा संघाने मांडलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रवाशांना वेळेनुसार आणि, सोयीस्कर प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आगार पातळीवर आवश्यक नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येईल असे आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड आणि आगार वाहतूक निरीक्षक मंगेश दहिहंडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान सदरील मागण्यांचे निवेदन सोलापूर विभागीय मंडळातील विभाग नियंत्रक आणि, विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याकडेही सादर करण्यात येणार असून मागण्यांची पूर्तता होण्यासाठी प्रवासी सेवा संघ सातत्याने पाठपुरावा करणार आहे असे संघाचे अध्यक्ष संजय पाटील आणि सचिव संजय चौगुले यांनी इथे स्पष्ट केले.
माढा-कुर्डूवाडी विभागातील प्रवाशांना नियमित, वेळेवर आणि, पुरेशी बससेवा मिळावी; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी तसेच, ग्रामीण भागातील नागरिकांना महत्त्वाच्या शहरांशी जोडणारी वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी ह्या उद्देशाने सोलापूर प्रवासी सेवा संघाने हा पुढाकार घेतलेला आहे.
सदरच्या सहविचार संवाद बैठकीस रा.प. महामंडळाचे कुर्डूवाडी आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड, वाहतूक निरीक्षक मंगेश दहीहंडे, प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव संजय चौगुले, माढा विभागप्रमुख नंदकुमार कुलकर्णी, सचिन पिलीवकर, काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, काँग्रेस पक्षाचे कुर्डूवाडी शहराध्यक्ष फिरोज खान, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हमीद शिकलकर, आदी उपस्थित होते.



