महाराष्ट्रात 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारची टीम घेणार दुष्काळी भागाचा आढावा
मुंबई -दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक उद्यापासून म्हणजेच 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच राज्यातील दुष्काळ स्थितीबाबत त्यांना माहिती दिली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘आपण जो काही प्रस्ताव पाठवला आहे त्याची माहिती देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेलो होतो. त्या प्रस्तावाची प्रतदेखील अमित शाह यांना दिली आहे. मी त्यांना सांगितलं की, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या देखील तयार होणार आहे. चाऱ्याची समस्यादेखील तयार होणार आहे. जवळपास 32 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघायला मिळत आहे आणि आपण विचार केला तर 80 टक्के तालुके हे दुष्काळाने पूर्णपणे प्रभावित पाहायला मिळतात. केंद्र सरकारने महाराष्ट्राला विशेष मदत करावी. आम्ही जो प्रस्ताव पाठवतोय त्या संदर्भात तात्काळ केंद्राची टीम यावी, अशाप्रकारची विनंती त्यांना केलेली आहे.’ या भेटीनंतर केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासूनच राज्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे.



