ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना

‘काका’ अशी ओळख असलेले बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते राजेश_खन्ना यांचा आज दि. २९ डिसेंबर जन्मदिवस.
‘बाबु मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ हैं जहापनाह… जिसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं… हम सब तो रंगमंच की कटपुतलियां हैं, जिसकी डोर उपरवालेकी उंगलीयोंमें बंधी हैं… कब कौन कैसे उठेगा कोई नही बता सकता…’ ‘ आनंद ‘ कभी मरते नही वह हमेशा याद रहते हैं.
जतीन खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ ला पंजामधील अमृतसर येथे लाला हिरानंद खन्ना आणि चंद्राणी खन्ना यांच्या घरात झाला, परंतु त्यांना त्यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या चुन्नीलाल आणि लीलावती खन्ना यांनी दत्तक घेतले आणि नाव ठेवले राजेश. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण झाले. दत्तक वडिलांच्या इच्छेविरुद्ध अभिनयात कारकीर्द सुरू केली.
१९६५ मध्ये, युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरने अखिल भारतीय अभिनय प्रतिभा स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा राजेश खन्ना आणि फरीदा जलाल यांनी जिंकली. बी. आर. चोप्रा, बिमल रॉय, जी. पी. सिप्पी, एच. एस. रवैल, नासिर हुसेन, जे. ओम प्रकाश, मोहन सहगल, शक्ती सामंत, चेतन आनंद आणि सुबोध मुखर्जी आदी प्रमुख चित्रपट निर्माते या स्पर्धेचे परीक्षक होते. राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटातून इंद्राणी मुखर्जी यांच्यासोबत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी रविंदर दवे यांच्या ‘राज’ (१९६७) या चित्रपटात अभिनय केला. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. एस. एस. वासन आणि एस. एस. बालन यांच्या ‘औरत’ (१९६७), नासिर हुसेन यांच्या ‘बहारों के सपने’ (१९६७) आणि असित सेन यांच्या ‘खामोशी’ (१९६९) या चित्रपटातून आपली अभिनय कारकिर्द सुरु ठेवली.
१९६९ मध्ये ‘आराधना’ चित्रपट आला, या चित्रपटाने राजेश खन्ना यांच्या अभिनय कारकिर्दीतील निर्णायक वळण दिले. हवाई दलाच्या पायलट आणि पायलटच्या मुलाची त्यांनी साकारलेली दुहेरी भूमिका यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाची गाणी, विशेषतः ‘मेरे सपनों की रानी’ ही सदाबहार हिट ठरली. त्याच वर्षी, त्यांनी यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तेफाक’ या रहस्यमय चित्रपटात काम केले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेली भूमिका उल्लेखनीय ठरली. एकही गाणे नसलेल्या या चित्रपटाने यशस्वी अभिनेता म्हणून राजेश खन्ना यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली.
१९६९ ते १९७१ या काळात राजेश खन्ना यांचे आलेले सलग १५ चित्रपट सुपरहिट ठरले. हा एक विक्रम आहे. ‘बंधन “,’ डॉली”, ‘काटी पतंग “,’ अमर प्रेम”, ‘द ट्रेन “,’ सच्चा झुठा”, ‘सफर “,’ आन मिलो सजना”, ‘काटी पतंग “,’ मेहबूब की मेहंदी”, ‘आनंद “,’ अंदाज”, ‘मर्यादा “आणि’ हाथी मेरे साथी” हे त्यांचे अविस्मरणीय चित्रपट आहेत. पडद्यावरील भावपूर्ण अभिनयाने त्यांना चाहत्यांनी ‘काका’ ही पदवी दिली.
‘आनंद’ (१९७१) मध्ये राजेश खन्ना यांनी दुर्धर आजार असलेल्या रुग्णाची भूमिका साकारली होती, मृत्यूच्या दारात असूनही आनंद आणि सकारात्मकता सांगणाऱ्या आनंदची ही भूमिका. अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्यांचा अभिनय हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनयांपैकी एक मानला जातो. चित्रपटाचे संवाद, राजेश खन्ना यांचा उत्कट अभिनय आणि ‘कहीं दूर जब’, ‘मैंने तेरे लिए’ आणि ‘जिंदगी कैसी है पहेली’ यासारखी गाजलेली गाणी यामुळे आजही हा चित्रपट सिनेप्रेमींच्या स्मरणात आहे. त्यांनी साकारलेल्या महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक ‘अमर प्रेम’ या चित्रपटात होती, दारुच्या आहारी गेलेला व गणिकेच्या सहवासात आपले एकाकीपणावर इलाज शोधणाऱ्या व्यावसायिकाची शक्तीशाली भूमिका त्यांनी साकारली होती. ‘चिंगारी कोई भडके’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ आणि ‘ये क्या हुआ’ ही या चित्रपटातील गाणी आजही श्रवणीय आणि लोकप्रिय आहेत.
हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘बावर्ची’ मध्ये राजेश खन्ना यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या स्वयंपाक्याची भूमिका साकारली होती, अकार्यक्षम आणि एकत्र राहूनही विभक्त असणाऱ्या कुटुंबात सुसंवाद घडविणाऱ्या त्याच्या आकर्षक आणि विनोदी अभिनयामुळे हा चित्रपट अभिजात कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट ठरला. हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘नमक हराम’ या चित्रपटात भूमिका दिली. मैत्री आणि श्रीमंत – गरीब वर्ग संघर्षावर आधारित चित्रपटातील राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
राजेश खन्ना यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड होती, त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेकदा महिला त्यांच्या घराबाहेर रांगेत उभ्या असायच्या. काही चाहत्यांनी रक्ताने पत्रे लिहिली. तरुणींनी त्यांच्या छायाचित्रांशी लग्न केली. राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणाऱ्या फॅन्सची संख्याही मोठी असायची. भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले.
१९७० च्या दशकात त्यांचे ‘मेहबूब की मेहंदी’ (१९७१) ‘छोटी बहू’ (१९७१) ‘दुश्मन’ (१९७२) ‘जोरू का गुलाम’ (१९७२) ‘मेरे जीवन साथी’ (१९७२) ‘अनुराग’ (१९७२) ‘राजा राणी’ (१९७३) ‘दागः अ पोएम ऑफ लव्ह’ (१९७३) ‘आप की कसम’ (१९७४) ‘अजनबी’ (१९७४) ‘रोटी’ (१९७४) ‘प्रेम कहानी’ (१९७५) ‘मेहबूबा’ (१९७६) ‘आइना’ (१९७७) ‘छैला बाबू’ (१९७७) ‘आशिक हूं बहारों का’ (१९७७) ‘अनुरोध’ (१९७७) ‘नौकरी’ (१९७८) ‘जनता हवलदार’ (१९७९) ‘रेड रोझ’ (१९७९), थोडीसी बेवफाई (१९८०) या चित्रपटांनी सिनेरसिकांवर गारुड केले होते. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्व्गायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात ‘आराधना’ आणि ‘अमर प्रेम’ याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते.
बासू भट्टाचार्य यांच्या ‘अविष्कार’ (१९७४) मध्ये राजेश खन्ना यांनी विवाहित पुरुषाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट वैवाहिक समस्यांचे वास्तववादी चित्रण करणारा होता. या चित्रपटाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. १९७० च्या दशकाच्या मध्यापासून, तिकीट खिडकीवर राजेश खन्ना यांची जादू कमी होऊ लागली होती. तरी त्यांचे चित्रपट येत होते. त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळत होता. पण राजेश खन्ना यांचा मिडास टच नाहीसा झाला होता. ते अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक वादांमध्येही गुंतले. त्यातच ॲग्री यंग मॅन म्हणून अमिताभ बच्चन यांच्या उदयामुळे त्यांच्या कारकिर्दीवर विपरित परिणाम झाला.
असे सर्व असूनही, राजेश खन्ना यांनी १९८० च्या दशकात अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले, चेतन आनंद दिग्दर्शित पुनर्जन्मावर आधारित ‘कुदरत’ (१९८१); ‘रेड रोझ’ (१९८०) हा मानसशास्त्रीय थरारपट होता यात राजेश खन्ना यांनी ग्रे शेड असणारी भूमिका साकारली होती; आंचल (१९८०) दर्द (१९८१) राजपूत (१९८२) दिल-ए-नादान (१९८२) धरम कांटा (१९८२) निशान (१९८३) अवतार (१९८३) सौतन (१९८३) अगर तुम ना होते (१९८३) मकसद (१९८४) मास्टरजी (१९८५) बेवफाई (१९८५) आखिर क्यों? (१९८५) अलग अलग (१९८५) अमृत (१९८६) नजराना (१९८७) अवाम (१९८७) विजय (१९८८) घर का चिराग (१९८९) स्वर्ग (१९९०) आणि आ अब लौट चलें (१९९०) या चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला.
यानंतर मात्र अभिनेता म्हणून त्यांचा अत्यंत वाईट काळ होता. रुपेरी पडद्यावर त्यांनी स्वीकारलेल्या चित्रपटातून त्यांचे हसू झाले. प्यार जिंदगी है हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट चित्रपट याच काळात आला.
वैयक्तिक जीवनात
रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु अभिनेता म्हणून अभूतपूर्व यश मिळाल्यावर त्यांचा ब्रेकअप झाला. मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या १७ वर्षाच्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता.त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली असून, १९८२ मध्ये त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली परंतु कधीही घटस्फोट घेतला नाही. राजेश खन्ना त्यांची तब्येत ढासळत जाईपर्यंत चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर काम करत राहिले. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. अखेरच्या काळात कर्करोगाशी झुंज देत असतांना १८ जुलै २०१२ ला हिंदी चित्रपटसृष्टीतील या पहिल्या सुपरस्टारने इहलोकाचा निरोप घेतला. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
– योगेश शुक्ल



