सामाजिक

गुंजन पाटील यांच्या ‘जाऊ कवितांच्या गावा’तून मानवी नातेसंबंध आणि प्रेमावर भाष्य 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत तिसरे पुष्प सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी गुंफले.गुंजन पाटील यांनी ‘जाऊ कवितांच्या गावा’तून मानवी नातेसंबंध आणि प्रेमावर भाष्य करत सर्वांना कवितेतून जीवन जगण्याचा संदेश दिला.
 प्रसिद्ध कवयित्री 
गुंजन पाटील यांनी ‘जाऊ कवितांच्या गावा’ 
या काव्यकार्यक्रमातून रसिकांना कवितांच्या भावविश्वाची अनोखी सफर घडवली. प्रेमकवितांच्या ओघवत्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली.मला आई व्हायचे नाही…, ‘बायको, थोडी साधी…’ यांसारख्या कवितांतून वैवाहिक जीवनातील गंमत, नात्यांमधील गोडवा आणि अपेक्षांचे विविध पैलू उलगडले, तर ‘तुमच्यात काय कला आहे, तुमच्यात कृष्णलीला आहे, मला माहीत आहे,’ अशा ओळींनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. साध्या, सहज आणि मिश्कील शब्दांतून मानवी स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या कवितांनी उपस्थितांना कधी हसवले, तर कधी प्रेमाच्या 
भावविश्वात रमवले.
प्रेम म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील 
आकर्षण नव्हे, तर त्यात दडलेली काळजी, समजूतदारपणा, अपेक्षा आणि भावनिक गुंतवणूकही असते, याची जाणीव गुंजन 
पाटील यांच्या कवितांतून झाली. स्त्रीमनातील हळवेपणा, कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंत, संसारातील रोजच्या अनुभवांमधून उमटणाऱ्या भावना आणि तरुणाईच्या प्रेमाविषयीच्या कल्पना त्यांनी आपल्या शब्दांतून प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या कवितांमध्ये अनुभवांची सहजता आणि भावनांची तरलता जाणवत होती. दैनंदिन जीवनात सहज घडणाऱ्या प्रसंगांना कवितेचे रूप देत त्यांनी रसिकांना स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडून घेतले. त्यामुळे या कार्यक्रमाला केवळ काव्यवाचनाचे स्वरूप न राहता, प्रेम, नाती आणि भावनांचा वेध घेणारा संवादात्मक अनुभव लाभला. शब्दांमधील मिश्कीलपणा आणि भावनांमधील प्रामाणिकपणा यांचा सुरेख मेळ त्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला.प्रारंभी पत्रकार मारुती बावडे,प्रशांत भगरे, अरविंद पाटील,शिवा याळवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी,नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी,अविनाश महागावकर,रेणुका महागावकर,डॉ.शिवराया आडवीतोटे,निलकंठ कापसे, राजू हिप्परगी, निनाद शहा, अतुल कोकाटे, प्रमोद लोकापुरे, प्रकाश घिवारे 
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडेराव घाटगे यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button