हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकर
फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या पुस्तकावर बंदी प्रकरण
पुणे : फुले-शाहू-आंबेडकरी विचार, साहित्य आणि शिक्षणाला मनुवादाच्या विरोधातील असल्याच्या कारणावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ‘हिटलरने ज्यांना बॅन करायचे होते, त्यांना अँटी-जर्मन ठरवून बंदी घातली. त्याच पद्धतीची विचारसरणी RSSने उचलली आहे, असे ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांना मनुवादी व्यवस्थेच्या विरोधातील ठरवून त्यांची समीक्षा करून ते अभ्यासक्रमातून वगळण्याची भूमिका पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलेल्या एका पत्रकातून समोर आले आहे. याचा संदर्भ देत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबत तपास करून मनुवादाच्या विरोधातील साहित्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, विद्यापीठांमध्ये शाहू, फुले, आंबेडकर शिकवले जातात. आता त्यांना हद्दपार करण्याचा मार्ग अवलंबला जात आहे. ही प्रक्रिया थांबवण्याची सुरुवात झाली पाहिजे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
1978―79 च्या काळात असाच प्रयत्न महाराष्ट्रात ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकावरून बाळ ठाकरे यांनी वाद निर्माण केला होता. त्याविरोधात लाखो फुले-शाहू-आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली होती. आणि सरकारला निर्णय मागे घ्यायला भाग पाडले होते. ती फुले,शाहू, आंबेडकरवाद्यांची देशभरातील ताकद आरएसएस-भाजपला बघायची आहे का? असा इशारा ही त्यांनी दिला.
हिटलरच्या काळात जर्मनीविरोधी असल्याचे कारण देऊन अनेक पुस्तकांवर बंदी घातली गेली होती. तसेच आरएसएस भाजप करत आहे. त्यांना ‘हिटलरची कॉपी करायची आहे. आरएसएस हे काही ओरिजनल थिंकर्स नाहीत’. मनुवाद हा सामाजिक दृष्टिकोनातून लोकांना ‘कैद’ करण्याची व्यवस्था आहे. महिला, शूद्र आणि अतिशूद्र यांच्यावर या व्यवस्थेचा परिणाम झाला. आता कोणीही कोणाचा गुलाम व्हायला तयार नाही. लोकांना स्वातंत्र्याने जगायचे आहे, असेही ते म्हणाले.
लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत –
सरकारने आपली भूमिका मागे घेतली नाही तर लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल, ती आम्ही निश्चितपणे देऊ, असेही त्यांनी सांगितले.
मोहन भागवत यांच्या अल्पसंख्याकांबाबतच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. एका बाजूला कैद करण्याचे चालले आहे आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याकांना कैद करण्याची भाषा नाही, अशी भूमिका भागवत कडून मांडली जाते. या दुहेरी भाषेपासून लोकांनी सावध राहावे. हिटलरशाही कोणाला घाबरते तर जनशक्तीला घाबरते. जनशक्ती रस्त्यावर उतरते आणि म्हणून त्यांचे धाबे दणाणले आहेत.
भाजप घाबरलेला असल्याचे दिसत असले तरी त्याला योग्य स्वरूप आणि आकार देणारी विरोधकांची एकजूट अद्याप दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जी भूमिका घ्यायला हवी, ती घेताना दिसत असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा हा जो जनसमूह, जेन झी आहे, त्याने आता हे सगळे ताब्यात घेतले पाहिजे आणि नेतृत्व केले पाहिजे. तोच तडजोड न करता उभा राहू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने संबंधित निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत हा निर्णय मागे न घेतल्यास संघर्ष करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




