अक्कलकोट ( प्रतिनिधी ) राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत .दुष्काळग्रस्त तालुक्यात तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आता शासनाच्या मदतीकडे बळीराजा म्हणजे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. खरीप हंगामात लाखो रुपयांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके हे दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत .यामध्ये अक्कलकोट तालुक्याचा समावेश आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुका हे तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. तसेच शिवसेना नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुष्काळी तालुका म्हणून अक्कलकोट घोषित करण्यात यावा अशी मागणी केली होती. अक्कलकोट तालुक्याला दुष्काळामुळे जबर फटका बसला आहे. पाऊस नसल्याने खरीप पिके करपून गेले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील सर्वच मंडळात पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील एकूण ६४ हजार ६७३ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी ४५ हजार ५४१ हेक्टर खरीप क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. पावसाने दडी मारल्याने ४५ हजार ५४१ हेक्टर खरीप क्षेत्रावरील पिके ही करपून गेली आहेत. खरीप हंगामातील मूग , सोयाबीन ,उडीद , सूर्यफूल ,बाजरी, तुर ,मका ,भुईमूग यासह सर्वच पिके ही करपून गेल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सुरुवातीला पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून खरीप हंगामातील पेरणी केली. खते , बी बियाणे व मशागतीवर हजारो रुपये खर्च करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून तसेच खाजगी सावकाराकडून कर्ज काढून शेतीसाठी पेरणी केली आहे. खरीप हंगाम हा पूर्णपणे हातचा गेल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच सोलापूर जिल्ह्यातील कारंबा येथे दुष्काळ पाणी दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची आश्वासन दिले आहे. आता या शासनाच्या मदतीकडे सोलापूर जिल्ह्यातील व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या पाहणी नंतर शेतकऱ्यांना शासनाची दुष्काळी आर्थिक मदत व विविध उपाय योजनांचा लाभ मिळणार आहे. सध्याचा भीषण दुष्काळ पाहता शासनाने बळीराजाला भरीव अशी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. लाखो रुपयांचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसान पाहता शासनाने शेतकऱ्यांना विशेष अशी आर्थिक मदत करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.




