महात्मा गांधीजी जयंती

दोन ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. आपण ज्यांना ओळखतो, त्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधीं’ची जन्मतारीख मात्र ती नव्हे. रोज नव्याने जन्मणारा हा माणूस सतत स्वतःवर प्रयोग करत राहिला. मातीत रुतलेले पाय आणि तरीही आकाशाकडे फैलावलेले हात, असा हा माणूस वाढत गेला. या लहान चणीच्या माणसानं त्यातून असं विलक्षण तेज मिळवलं की फाळणीनंतर नौआखालीत पेटलेल्या दंगलीत तो एकटा उतरला आणि अवतीभवतीच्या ज्वालांची पर्वा न करता निघाला.
आज सगळीकडे वणवा पेटलेला असताना या गांधींची पुन्हा पुन्हा आठवण येत राहाते. “हिंसेचीच भाषा ऐकू येत असताना, गांधी कसे आणि किती उपयोगाचे ठरणार आहेत?”, असा प्रश्न एका तरूण अभ्यासकाने मला विचारला. “गांधींचा काळ वेगळा होता. आता गांधी आले, तरी ते काही करू शकणार नाहीत. युद्धज्वर हा नव्या जगाचा आजार आहे आणि विखार हीच जगाची भाषा आहे. त्याला इलाज नाही आणि प्रेमाच्या भाषेचा उपयोगही होणार नाही.”, असे तो मला निराशेने सांगत होता.
मी म्हटले, “मित्रा, हाच तर गांधींसाठी सर्वोत्तम काळ आहे. गांधींचा काळ काही वेगळा नव्हता. तो याहून भयंकर होता. पहिले आणि दुसरे महायुद्ध अशा युद्धज्वर वाढलेल्या काळात जगभरात हिटलर आणि मुसोलिनी जन्माला येत असताना, भारतात मात्र ‘गांधी’ जन्माला आले!”
गंमत बघा. मुसोलिनी पत्रकारिता सोडून राजकारणात आला १९१२ मध्ये. हिटलर जर्मनीत आला १९१३ मध्ये. आफ्रिका सोडून गांधी भारतात परतले १९१५ मध्ये.
हिटलर जर्मनीचा राष्ट्रीय नेता झाला, तो १९२१ मध्ये.
मुसोलिनी इटलीचा पंतप्रधान झाला, तो १९२२ मध्ये.
महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले १९२४ मध्ये.
साधर्म्य इथेच थांबत नाही. हिटलर, मुसोलिनी, गांधी हे तिघेही लेखक, पत्रकार, प्रतिभावंत कम्युनिकेटर! हिटलरने त्याचे आत्मचरित्र ‘माइन काम्फ’ लिहिले ते १९२३ मध्ये. गांधींनी त्यांचे आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ लिहिले ते १९२७ मध्ये. मुसोलिनीचे आत्मचरित्र ‘माय ॲटोबायोग्राफी’ आले ते १९२८ मध्ये.
एकाच काळात, हिटलर – मुसोलिनी राज्य करत असताना, महात्मा गांधी जन्माला आले. हिटलर आणि मुसोलिनी संपले, पण गांधी रोज नव्याने जन्माला येत असतात.
‘One Little Man of India’ अशी ज्याची ओळख परदेशात करुन दिली जात असे, तो गांधी नावाचा माणूस पुन्हा पुन्हा भेटत राहतो. नव्या नव्या प्रदेशात, नव्या नव्या रुपात त्याचं पुनरुत्थान होत असतं. कधी तो मार्टिन ल्युथर किंगच्या रुपात भेटतो आणि सांगतो, ‘आय हॅव अ ड्रिम’! कधी खान अब्दुल गफारखानांच्या रुपानं ‘सरहद गांधी’ म्हणून भेटतो. कधी नेल्सन मंडेलांच्या वज्रमुठी उंचावत वर्णभेदाविरुध्द आरोळी ठोकतो. कधी गांधींचेच शब्द घेऊन उसने, आमचा बराक ओबामा म्हणतो, ‘Be the change, you believe in… Yes, we can!’
आजचा काळ कठीण खरा, पण म्हणूनच सर्वोत्तम आहे, गांधी पुन्हा जन्माला येण्यासाठी. आणि गांधींना पुन्हा जन्मायचे आहे, अवघ्या जगाला ‘सन्मति’ देण्यासाठी!
कधी कधी मला असं वाटतं, आपणच नव्यानं जन्माला आलो तर! आपल्यातही काही अंश असेलच की आपल्या बापाचा. आपल्या राष्ट्रपित्याचा. आपण का नाही होऊ शकणार गांधी? आतला आवाज ऐकू शकणारा, सत्याचे प्रयोग करणारा, स्वतःवर रोज प्रयोग करणारा हा गांधी आपल्यातही असेलच की. त्याला प्रत्यक्षात आणता यायला हवे.
गांधी म्हणजे निव्वळ गप्पा नाहीत. स्कॉलरली मांडणी नाही. आवेशपूर्ण भाषणं नाहीत.
गांधी म्हणजे विचार आणि कृती यातलं अद्वैत.
गांधी म्हणजे, थेट तसं जगणं.
‘वैष्णव जन तो तेने कहिये जे, पीड़ पराई जाने रे , असं होता येईल आपल्याला? एवढं सच्चं होता येईल आपल्याला? जो आपल्याला शत्रू वा स्पर्धक मानतो, त्याच्यावरही प्रेम करता येईल? वणवा शमवण्यासाठी अनवाणी पायानं, निर्भय मनानं धावता येईल? एखाद्या लहानग्याच्या निरागसतेनं आणि कुतुहलानं रोज जगाकडं नव्यानं बघता येईल? अशा झपाटलेपणानं आयुष्यभर काम करता येईल आपल्याला?
का नाही जमणार?
दूर तिकडच्या मंडेला आणि ओबामांना जमलं.
तर, तुला-मला का नाही जमणार?
गांधींचा आजचा हा बड्डे तुझा-माझा, त्याचा-तिचा प्रत्येकाचाच जन्मदिन ठरो.
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवा जन्मेन मी.
हॅपी बड्डे!
– संजय आवटे



