इब्राहिमपूर येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग : सुमारे २० एकर ऊस जळून खाक

अग्निशमन दलाच्या तातडीच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला
अक्कलकोट : ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील इब्राहिमपूर येथे शनिवारी दुपारी १२ वाजता शॉर्ट सर्किटमुळे उसाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० एकर ऊस जळून खाक झाला असून चार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या आगीत शेतकरी
श्रीकांत अमृत कौलगी – गट नं. ३८ , शांतप्पा गुंडप्पा दिंडूरे – गट नं. ३३ , लक्ष्मीकांत अप्पाशा कौलगी – गट नं. ३८/२, शरणबसप्पा यशवंत कौलगी – गट नं. ३७ आदींचा ऊस जळाला आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर काबाडकष्ट करून, कर्ज काढून, पाणी देऊन ऊस जगवला होता. तोडणीला आलेला ऊस डोळ्यादेखत जळून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आग लागल्याची माहिती इब्राहिमपूर येथील रिपाई तालुका उपाध्यक्ष रमेश बनसोडे यांनी रिपाई अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांना दिले. त्यांनी तात्काळ पं.स. उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांना संपर्क साधला. त्यांच्या तातडीच्या प्रयत्नामुळे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यात यश मिळवले.अग्निशमन दल वेळेत पोहोचले नसते तर सुमारे ५० एकर ऊस जळाला असता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.
संबंधित विभागाने तातडीने या शेतांचे पंचनामे करून, या चारही शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




