सोलापूर

ऊस दराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक

16 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, पहिली उचल 3 हजार जाहीर करणाऱ्या कारखानदारांविरोधात तिव्र संताप

सोलापूर –
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दराचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत येत्या सोमवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिली उचल प्रतिटन 3 हजार रुपये जाहीर केली आहे. मात्र, या दरावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला.

*साखर उद्योगाचे नुकसान केल्याचा आरोप -*
साखर कारखानदारांनी साखर उद्योगाचे नुकसान केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारकडे साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी प्रलंबित असताना दुष्काळाचे कारण पुढे करून यंदा महिनाभर आधीच कारखाने सुरू करण्यात आले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू झाल्याने सुरुवातीला साखरेचा उतारा (रिकव्हरी) अवघा सहा टक्क्यांच्या आसपास होता. त्यामुळे शेतकरी आणि साखर उद्योगाचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला.

याशिवाय, जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी यंदा साखर प्रतिक्विंटल 4200 ते 4300 रुपये दराने विक्रीचे करार करून व्यापाऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेतल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.

ऊस दराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत माघार नाही. सध्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, पहिली उचल समाधानकारक जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button