स्वातंत्र्य लढ्यातील योद्धा सुभाषचंद्र बोस

तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय असे मानावे लागेल. स्वातंत्र्य मिळविण्याचे त्यांचे मार्ग वेगळे होते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याशी त्यांचा संघर्षही झाला. पण त्यांची लोकप्रियता मात्र या संघर्षानंतरही वाढतच राहिली. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. द्वितीय महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखिल असेच मानत होते.
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते. प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.
आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.
लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाष मधली सुप्त देशभक्ती जागृत केली.
सुभाषचंद्र यांचे प्राथमिक शिक्षण युरोपियन शाळेत झाले. तेथे असलेल्या वातावरणाचा खोल परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडला. ते स्वतः धार्मिक असले तरी धर्माच्या नावावर चाललेल्या ढोंगावर त्यांचा विश्वास नव्हता. देवनशा शाळेत मॅट्रिकची परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी कोलकत्याच्या प्रेसिडेंट कॉलेजमध्ये प्रवेश केला. पण त्यावेळी ते अध्यात्मिक विचारांकडे झुकले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. याच विचारात ते गुरूच्या शोधात सोळा-सतरा वर्षाच्या वयात हिमालयात निघून गेले. चांगला गुरू त्यांना मिळाला नाही. पण स्वामी विवेकानंद यांच्या सानिध्यात राहून त्यांनी रामकृष्ण मिशन संदर्भात माहिती घेतली. त्यांच्या आई-वडिलांनी इंग्लंडला जाऊन आयसीएस करण्याचा सल्ला दिला. पण त्यावेळी वातावरण सरकारविरोधात होत होते. गांधीजींचे असहकार आंदोलन जोर पकडत होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा संताप अजूनही शांत झालेला नव्हता. अशावेळी सुभाषचंद्र यांचे रक्त तापत होते. या आंदोलनात उडी घेण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या सल्ल्यामुळे अखेर आयसीएस करण्यासाठी ते इंग्लंडला गेले.कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाष ने महाविद्यालयात संप पुकारला होता. १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
१९२० मध्ये ते आयसीएस उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी घरच्यांना पत्र लिहिले. दुर्देवाने या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो आहे. पण मी प्रशासकीय अधिकारी बनणार की नाही हे मी सांगू शकत नाही. मला असे वाटते की मी माझा देश आणि ब्रिटिश साम्राज्य या दोघांची सेवा एकावेळी करू शकणार नाही. लवकरच मला यापैकी एक निवडावे लागेल. त्यानंतर त्यांनी देशसेवेचा मार्ग पत्करला. परीक्षेनंतर मिळालेल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते भारतात परतले. १६ जुलै १९२१ ला भारतात परतल्यानंतर ते मुंबईत महात्मा गांधी यांना भेटले. तेथे त्यांच्यात एक तास चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी गांधीजींना विचारले होते, असहकाराचा अर्थ मला समजतोय. पण ही अहिंसा म्हणजे काय?
अहिंसेचा मार्ग त्यांना कधीच मान्य नव्हता. त्यामुळेच त्यांचे कायम गांधीजींशी मतभेद राहिले. पुढे २५ डिसेंबर १९२१ मध्ये प्रिंस ऑफ वेल्स कोलकता येथे आले. त्यावेळी संपूर्ण देशात त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. कोलकत्यात झालेल्या निदर्शनात भाग घेऊन सुभाषचंद्र यांना सहा महिन्याची शिक्षा झाली. त्यानंतर दासबाबू यांनी स्वराज दल स्थापन केले. सुभाषचंद्र या दलाचे प्रमुख होते. या दलाचे मुखपत्र फॉ़रवर्डचे ते संपादकही होते.
लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.
१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.
जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
सुभाषबाबूंच्या मनातील मार्ग ब्रिटिशांनी ओळखून त्यांना १९२४ मध्ये नजरकैदेत ठेवले. त्यांच्यावर ते क्रांतीकारक असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यावेळी दासबाबूंनी सुभाषचंद्र यांना सोडून द्यावे किंवा त्यांच्यावर खटला तरी चालवावा अशी मागणी केली. पण सरकारने त्यांना ब्रह्मदेश येथील मंडालेच्या तुरूंगात पाठवले. संपूर्ण देशात याविरूद्ध संतापाची लाट पसरली.
पुढे नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.
काबुल मध्ये उत्तमचंद मल्होत्रा नामक एका भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकीलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. ह्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकीलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. इटालियन वकीलातीत त्यांच्या प्रयत्नांना यश आले. जर्मन व इटालियन वकीलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबुलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.
बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले. अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते एडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.
काही वर्षांपूर्वी अॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्त्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले. शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबिद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र आदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.
पूर्व आशियात पोचल्यावर सुभाषबाबूंनी सर्वप्रथम, वयोवृद्ध क्रांतिकारी राषबिहारी बोस ह्यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. सिंगापूर येथील फेरर पार्कामध्ये राषबिहारी बोस ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले. नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.
ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले. आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.
पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषण करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला. द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळ व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.
आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला. जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
जपानच्या शरणागतीनंतर आझाद हिंद सेनेसमोरही कोणताच पर्याय नव्हता. २८ मे १९४५ नंतर आझाद हिंद सेनेचे संघटन संपुष्टात आले. द्वितीय महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमिवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले. अपघातग्रस्त विमानात नेताजींसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.
स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नव्हता. १९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमिवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.
ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरीत रहस्य बनले आहे.
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.
– योगेश शुक्ल 



