शैक्षणिक
नागनळळी आश्रमशाळेत इन्स्पायर अवॉर्ड कार्यशाळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )नागनळळी आश्रमशाळेत १३ ऑगस्ट वार गुरुवार रोजी अक्कलकोट तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, पंचायत समिती अक्कलकोट आणि आश्रमशाळा नागनळळी यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अवॉर्ड कार्यशाळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत विज्ञान विषयात आपल्या-आपल्या शाळेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सौ. रश्मिताई हिप्परगी, सभापती, पंचायत समिती अक्कलकोट यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सचिव जावेद पटेल, उपाध्यक्ष जलील पटेल, सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ, परीक्षा प्रमुख शीतल पाटील, अक्कलकोट तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शंभूलिंग बशेट्टी, सचिव सतीश मर्जी तसेच प्राचार्य मुजावर आय. एम. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कु. शांभवी आजगुंडे शिक्षक रमेश उमाटे (मंगरूळ प्रशाला, अक्कलकोट) हिची राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच ओंकार फडतरे, महेश टेंगळे व मार्गदर्शक शिक्षक रवींद्र नवले, वसीम शेख (के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनळळी) याची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
जुबेर जमादार मार्गदर्शक शिक्षक मोहन गुरव,अमोल पाटील (के. बी. एन. माध्यमिक आश्रमशाळा, नागनळळी) याने राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून संस्थेच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याचबरोबर रमेश उमाटे व विकास पवार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
इन्स्पायर अवॉर्डसाठी नामांकन सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत विज्ञान शिक्षकांना सखोल व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. शीतल पाटील, रमेश उमाटे आणि संजय जवंजाळ यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि संशोधनवृत्ती रुजविण्यासाठी इन्स्पायर अवॉर्डसारख्या उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यशाळेस तालुक्यातील तब्बल ११२ विज्ञान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे कार्यशाळेला व्यापक प्रतिसाद मिळाला. विज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि संशोधनात्मक विचारांना चालना देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
सदरील कार्यक्रमात आश्रम शाळेतील संगीत विभागाने रुद्राक्ष वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली गितगायनातून सर्वांचे मनोरंजन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रमशाळा नागनळळी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गुरव व मनोज जगताप यांनी प्रभावीपणे केले, तर शिवाजी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.




