शैक्षणिक
झोक्याची कोंडी निसटली अन् सिलिंगचे प्लास्टर अंगावर; बबलाद शाळेत १३ विद्यार्थी, दोन शिक्षक जखमी , मुख्यकार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची माहिती

अक्कलकोट (प्रतिनिधी ):अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या व्हरांड्यात सिलिंगचे प्लास्टर अंगावर पडून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. सुरुवातीला शाळेची इमारत जीर्ण असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा होती. मात्र, विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर झोक्याची कोंडी निसटल्याने निर्माण झालेल्या गोंधळात व्हरांड्यातील तीन ठिकाणचे सिलिंगचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याचे समोर आले आहे.
अक्कलकोट पंचायत समिती येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी या घटनेची माहिती दिली. शाळेच्या व्हरांड्यात झोका बांधण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी झोक्यावर बसले होते, तर काही विद्यार्थी दोरीवर चढले होते. अचानक झोक्याची कोंडी निसटल्याने गोंधळ उडाला. त्याचवेळी व्हरांड्यातील सिलिंगचे तीन ठिकाणचे प्लास्टर खाली कोसळून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बबलाद येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. स्वामी समर्थ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचीही कुशल जैन यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला. विद्यार्थ्यांच्या उपचाराच्या खर्चाची काळजी करू नका, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर झोक्याची कोंडी निसटल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्याचे कुशल जैन यांनी सांगितले. या प्रकरणी मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक आणि केंद्रप्रमुखांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अक्कलकोटमध्ये १२२ वर्गखोल्या धोकादायक
अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५४ शाळा असून, त्यामध्ये एकूण १,१९६ वर्गखोल्या आहेत. यापैकी १३८ वर्गखोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यामध्ये तब्बल १२२ वर्गखोल्या धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. यापैकी ६० वर्गखोल्या पाडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, बबलाद येथील शाळेची नोंद धोकादायक इमारतीमध्ये नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
तीन महिन्यांत सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट
तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची तपासणी करण्यात येणार असून, आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यांत याचा अहवाल घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवतिके, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी करजखेड आणि कार्यालय अधीक्षक दयानंद परिचारक उपस्थित होते.
चौकट : १५ दिवसांत कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देण्याचे आश्वासन
अक्कलकोट तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत आरबळे यांच्या कामकाजाबाबत वारंवार तक्रारी होत असतानाही कारवाई का होत नाही? “ते जिल्हा परिषदेचे जावई आहेत का?” असा संतप्त सवाल पत्रकारांनी उपस्थित केला. यावर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अक्कलकोट तालुक्याला पंधरा दिवसांत कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्या कामकाजामुळे शाळांचा दर्जा घसरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची कितपत अंमलबजावणी होते, याकडे अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.




