सोलापूर

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर : ( प्रतिनिधी )
सोलापूर जिल्हा परिषदेतील ‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलण्याचा करण्यात आलेला ठराव रद्द करून गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित असलेले ‘शिवरत्न’ हेच नाव कायम ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाला सुमारे ४० वर्षांपूर्वी ‘शिवरत्न’ हे नाव देण्यात आले होते. हे नाव महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असून त्यास ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. अशा परिस्थितीत या सभागृहाचे नाव बदलण्याचा निर्णय हा सोलापूर जिल्ह्याच्या जनभावनांचा अनादर करणारा असून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ‘शिवरत्न’ हे नाव बदलून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाला कोणताही विरोध नसून, त्यांच्या नावाने नवीन वास्तू अथवा सभागृह उभारून त्यास नाव देण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. मात्र, गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेले ‘शिवरत्न’ हे नाव कायम ठेवावे, अशी लोकशाही मार्गाने मागणी करण्यात आली. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भगवान शिवशंकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवरत्न अशी फोटो प्रतिमा भेट देण्यात आले
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड (दक्षिण सोलापूर), जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष प्रवीण इरत शेट्टी, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष पद्मसिंह शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजित पात्रे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button