सोलापूर

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री फडणवीसांची सपत्नीक शासकीय महापूजा

‘पंढरपूर कॉरिडॉर’ अडीच वर्षांत पूर्ण करण्याची घोषणा

पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती माने यांच्या समवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी मंदिर परिसरातील सत्कार समारंभात बोलताना त्यांनी ‘पंढरपूर कॉरिडॉर’ प्रकल्प कोणावरही अन्याय न करता, सर्वांचे योग्य पुनर्वसन करून येत्या अडीच वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी घोषणा केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, तर स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे आणि भाडेकरूंनाही योग्य व्यवस्था उपलब्ध होईल.

यंदाच्या आषाढी वारीत दर्शनासाठी तब्बल २५ किलोमीटरहून अधिक लांबीची रांग लागल्याचा उल्लेख करत त्यांनी वारकऱ्यांच्या संयमाचे आणि भक्तिभावाचे कौतुक केले. चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे सांगत, वाळवंटातील व्यवस्थेबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कामाचाही गौरव केला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापूजेनंतर मानाचे वारकरी दाम्पत्य बाबासाहेब व प्रभावती माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना एसटी महामंडळाकडून वर्षभरासाठी मोफत प्रवास पास देण्यात आला.

याच कार्यक्रमात पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त वारीसाठी जनजागृती करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button