सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मोफत बियाणे केंद्र सुरू करा; शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना वेळेत, दर्जेदार आणि मोफत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक गावात मोफत बियाणे वितरण केंद्र अथवा दुकान सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून असून त्यामध्ये अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी बियाण्यांच्या वाढत्या किमती, हवामानातील बदल, दुष्काळी परिस्थिती आणि उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार बियाणे मिळत नाहीत. परिणामी उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना गावपातळीवरच मोफत आणि दर्जेदार बियाण्यांची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात त्यांनी प्रत्येक गावातील केंद्रांमधून प्रमाणित व उच्च दर्जाची बियाणे उपलब्ध करून देणे, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवश्यक बियाण्यांचा पुरेसा साठा ठेवणे, अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना प्राधान्य देणे तसेच ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने वितरण व्यवस्था राबविण्याची सूचना केली आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल, शेती उत्पादनात वाढ होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मोफत बियाणे केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.



