टॉप न्यूज
अक्कलकोट शहरातील हुतात्मा स्तंभ अडगळीला !

एवन चौकात जागा देण्याची मागणी
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्माअर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ नगर परिषदेकडून उभारण्यात आलेला हुतात्मा स्तंभ हा अडगळीला गेला आहे. एवन चौकातील श्री स्वामी समर्थ उद्यानात स्थलांतरित केलेला हुतात्मा स्तंभ पुन्हा एवन चौकात दर्शनी भागात निर्माण करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिकांतून केली जात आहे.
अक्कलकोट शहरातील एवन चौकात नगर परिषदेकडून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन आत्मार्पण केलेल्या आणि कारवास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्तंभ उभारण्यात आले होते. या हुतात्मा स्तंभावर सहा स्वातंत्र्यसैनिकांची नावे आणि भारतीय संविधानातील उद्देशिकाची कोनसीला लावण्यात आली होती. अक्कलकोट नगर परिषदेकडून सध्या मंगरूळ हायस्कूल ते कारंजा चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पूर्वी एवन चौकात उभारण्यात आलेले हुतात्मा स्तंभ हे रस्ता रुंदीकरणामुळे एवन चौकाच्या बाजूस असणाऱ्या श्री स्वामी समर्थ उदयानात हलविण्यात आले आहे. सदरचे हुतात्मा स्तंभ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिक असून भावी पिढीला प्रेरणा देणारे असताना नगरपरिषदेकडून हुतात्मा स्तंभ अडगळीला टाकण्याचा प्रकार झाला आहे. हुतात्मा स्तंभ हा दर्शनी भागात लावल्यास नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थी यांना त्याचे दररोज दर्शन होणार आहे. एवन चौकातील हुतात्मा स्तंभास अभिवादन करून मोर्चे, आंदोलन , अभिवादन करणे आदी कार्यक्रम घेतले गेले आहेत. अक्कलकोट नगर परिषदेने सदरचे हुतात्मा स्तंभच अडगळीला टाकून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पुसण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रप्रेमी नागरिकांतून केला जात आहे. अक्कलकोट नगर परिषदेने एवन चौकातील हुतात्मा स्तंभ पूर्ववत नगरपरिषदेच्या जागेतील दर्शनी भागात बसवावा अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिकांतून केली जात आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिला आहे.



