राजकीय

काँग्रेस पक्षाच्या ‘संगठन सृजन’ अभियानात मोठी अनागोंदी; प्रदेशाध्यक्ष सपकाळ हटाव मोहिमेची सोलापुरातून निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून सुरुवात

 

सोलापूर: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ‘संगठन सृजन अभियान’ ह्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी झाल्याचा आरोप करीत नाराज झालेल्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधातच “सपकाळ हटाव” मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियानाच्या नियोजनात प्रचंड गोंधळ, प्रामाणिक व सक्रिय कार्यकर्त्यांना डावलणे तसेच, अनेक स्थानिक कार्यकर्ते तथा वरीष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव यांमुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे कार्यकर्त्यांनी याठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या अभियानासाठी सोलापूर जिल्ह्यातील तीनही काँग्रेस कमिट्यांचे मुख्य निरीक्षक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीने ओडिशा राज्यातील माजी आमदार तथा तेथील प्रदेश कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष देबाशिस पटनायक यांची विशेष नियुक्ती केली होती. त्यांनी राजधानी नवी दिल्ली येथे ‘संगठन सृजन अभियान’ यासंदर्भात अतिशय निःपक्षपातीपणे आपला अहवाल सादर केलेला असतानाही त्यामध्ये येथील प्रस्थापित नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने आपला‌ हस्तक्षेप करून जिल्हाध्यक्षांना नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत निरीक्षक देबाशिस पटनायक यांना जाब विचारला असता, “मी त्यांना माझा योग्य तो अहवाल दिलेला आहे. त्यामध्ये काही गडबड झाली असल्यास मी त्याचा पाठपुरावा दिल्ली दरबारी करीन” असे अगदी स्पष्टपणे सांगितल्याचा दावा इथे कार्यकर्त्यांनी केला.

ही ‘संगठन सृजन अभियान’ नामक निवडीची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून इथे राबविली जात होती. परंतु, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना याबाबत जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विचारणा केली असता त्यांनी त्यांना कोणतेही उत्तर देण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे.
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ह्या प्रकरणात ठोस पावले उचलणे आम्हाला अपेक्षित होते. मात्र, तसे न करता उलट दिल्लीचे नांव पुढे करून पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर, तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवावे” अशी मागणी राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे करणार असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे स्पष्ट केले.
तसेच; काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न देणे, कार्यक्रमाची माहिती वेळेवर न मिळणे आणि, स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. सदर पार्श्वभूमीवर “सपकाळ हटाव” मोहिम राज्यभर राबविण्याचा इशारा जिल्ह्यातील नाराज गटाने दिला आहे.
नाराज कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष नेतृत्वाकडे अधिकृत तक्रार पाठविण्याचा निर्णय घेतला असून लवकरच काही राज्यस्तरीय वरीष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.
“पक्ष मोठा करण्याऐवजी काहीजण स्वतःची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे, पक्षाचे मोठ्या प्रमाणात संघटनात्मक नुकसान होत आहे” असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मनपा परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी इथे केला.

आजच्या महत्वपूर्ण अशा पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी अशोक चोपडे, राजकुमार पवार, सुरेश हावळे, राहुल कौलगे-पाटील हे याठिकाणी उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button