राजकीय
अक्कलकोटचे तत्कालीन तहसिलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अक्कलकोटचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे यांची निर्दोष मुक्तता

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे तत्कालिन तहसिलदार गुरुलिंगप्पा बिराजदार यांचेवर जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी शंकर म्हेत्रे यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश . सूरज केंद्रे यांनी सुनावली.
सदर गुन्हयाची हकीकत अशी की –
दि.०८/०५/२०१५ रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास यातील फिर्यादी तहसिलदार यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला व एक गोपनीय पथक तयार करुन दुधनी गावातील फ्रुटी बार व आर्केस्ट्रा बार येथे नियमाप्रमाणे चालवित आहेत की नाही हे पाहण्याकरीता हे पथक दुधनी येथे गेले. सदर पथकामध्ये तत्कालिन मंडल अधिकारी सगर, तलाठी हुडीवाले, तलाठी पवार, चालक तपकिरे, व्हिडीओग्राफर विजय जाधव, पो.हे.कॉ. गजभारे, पो. कॉ. जतकर चव्हाण, शिंदे असे पथक दुधनी येथे रवाना झाले. जेंव्हा सदर पथक दुधनी येथील फ्रुटी बार येथे पोहचले. त्यावेळी पथकामधील काही कर्मचारी फ्रुटीबारच्या आत गेले, त्यावेळी व्हिडीओ शुटींग करतेवेळी सर्व कामगार आवराआवरी करु लागले. त्यावेळी यातील आरोपी शंकर म्हेत्रे कशाची शुटींग करत आहात असे विचारले असता ते ऐकून घेतले नाही व तहसिलदार यांच्या अंगाशी झटापट करुन मारहाण केली व त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन शंकर म्हेत्रे पळून गेले. अशा आशयाची फिर्याद तहसिलदार यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशन येथे दिली.
सदर खटल्याची सुनावणी मे. जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे झाली. सदर खटल्यात फिर्यादी गुरुलिंगप्पा बिराजदार तत्कालिन तहसिलदार सोबत तलाठी हुडीवाले, नायब तहसिलदार प्रकाश सगर पो. शिपाई सुनिल जतकर, वगैरे असे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते. यात बचावतर्फे बाजू मांडताना असा युक्तिवाद करण्यात आले की, यातील तत्कालिन तहसिलदार कुठल्या कायद्यांतर्गत रेड टाकले आहेत. तसेच सदर ठिकाणी कुठलीही कारवाई न करता निघून येणे तसेच फिर्यादी व नेत्र साक्षीदार यांच्या जबाबात तफावत दिसून आले व तसेच वैद्यकीय अहवाल हे देखील सरकारी पक्षाच्या केसशी सुसंगत दिसून आले नाही असे वगैरे मुद्दे मांडण्यात आले. वरील सर्व मुद्दे मे. कोर्टाने ऐकून घेऊन आरोपी शंकर म्हेत्रे यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले.
सदरकामी आरोपी तर्फे अॅड. विक्रांत फताटे, अॅड. राजीव चव्हाण, अॅड. प्रकाश फताटे, अॅड. तारासिंग राठोड, अॅड. विशाल भरमशेट्टी, अॅड. साईनाथ मेकाले, अॅड. प्रसाद बिराजदार यांनी काम पाहिले व सरकार तर्फे अॅड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.




