नरसापूर प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशी द्या, शक्ती कायदा लागू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा — खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर – ( प्रतिनिधी )सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर शहरातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली असून महाराष्ट्रात गुन्हेगारांच्या मनातून पोलिसांचा धाक संपला आहे. नरसापूरमध्ये एका निष्पाप चिमुकलीवर बलात्कार करून अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. ही घटना केवळ संतापजनक नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. त्या चिमुकलीचे फोटो पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात, मनात प्रखर चीड निर्माण होते. अशा वासनेने पिसाळलेल्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे.
खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, हा गुन्हा पोक्सो अंतर्गत नोंदविण्यात आला असला तरी अशा प्रकरणांमध्ये कठोर आणि जलद शिक्षा होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात निर्भया प्रकरणानंतर शक्ती कायद्याची संकल्पना पुढे आली होती. राज्य सरकारने तात्काळ शक्ती कायदा लागू केला असता, तर अशा गुन्ह्यांतील आरोपींना अल्पावधीत फाशी शिक्षा झाली असती. त्यामुळे राज्य सरकारने कोणताही विलंब न करता शक्ती कायदा लागू करावा.
पुरोगामी महाराष्ट्रात एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर एवढ्या अमानुष पद्धतीने अत्याचार होऊन हत्या झाली असताना मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीतील जल्लोष साजरा करणे, पेढे वाटणे आणि उद्घाटनांचे कार्यक्रम घेणे ही अत्यंत असंवेदनशील बाब आहे. राज्यात महिलांवर, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असताना सत्ताधाऱ्यांना जनतेच्या वेदनेचे काहीही भान राहिलेले दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.
ही एकच घटना नाही. गेल्या तीन-चार दिवसांत सोलापूर शहर व जिल्ह्यात दिवसाढवळ्या आठ ते दहा खुनांच्या घटना घडल्या आहेत. बलात्काराचे अनेक गुन्हे घडले मग राज्याचे प्रशासन नेमके कुठे आहे? कायदा-सुव्यवस्था कोणाच्या भरोशावर चालली आहे? गृहमंत्र्यांना आपल्या पदाची जबाबदारी पेलता येत नसेल, तर त्यांनी ती जबाबदारी दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे द्यावी.
राज्यात अवैध धंदे, वाळू माफिया, गुन्हेगार आणि काही ठिकाणी प्रशासन यांची साखळी निर्माण झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कोणतीही भीती उरलेली नाही. नरसापूर प्रकरणातील आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल होते, तरी तो न्यायालयातून सुटतो कसा, त्याला जामीन कोण देतो, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.
राज्यात दर तासाला एका चिमुकलीवर अत्याचार होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एका वर्षात सोलापूर जिल्ह्यात जवळपास पाचशे पोक्सो गुन्हे दाखल झाले असून राज्यात हा आकडा तेरा हजारांवर गेला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. एवढेच नव्हे तर अनेकदा पोक्सोमधील पीडितेची ओळखही उघड केली जाते, ही अत्यंत चुकीची आणि अमानवी बाब आहे.
सत्ताधारी महिला आरक्षण, महिला सशक्तीकरण आणि महिला सुरक्षेच्या मोठमोठ्या घोषणा करतात; परंतु प्रत्यक्षात साडेतीन वर्षांची मुलगीसुद्धा सुरक्षित नाही, हीच आजच्या सरकारची खरी शोकांतिका आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली तरच भविष्यात कोणी अशा पाशवी कृत्याला धजावणार नाही.
शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नरसापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार हा राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार आहे. अशा बलात्कारी, गुन्हेगार, अवैध धंदे आणि माफियांना जर शासन-प्रशासन पाठीशी घालत असेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. नरसापूर प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या, शक्ती कायदा लागू करा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार, पीडितेचे नातेवाईक, माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, हेमाताई चिंचोळकर, भारतीताई ईप्पलपल्ली, शुभांगी लिंगराज, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


