काँग्रेस पक्ष तब्बल दहा वर्षांनंतर केरळमध्ये सत्तेत

केरळ – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू असून सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांमध्ये अत्यंत धक्कादायक उलटफेर पाहायला मिळत आहेत. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेस पक्षासाठी आजचे निकाल अतिशय गोड बातमी घेऊन आले आहेत. तीन वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता काँग्रेस पुन्हा एकदा एका अतिशय महत्त्वाच्या राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस आता केरळमध्ये सत्तेचा दुष्काळ संपवत असल्याचे चित्र आहे. मागील १० वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेला हा पक्ष आता प्रचंड बहुमतासह दमदार पुनरागमन करत आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीला तब्बल ८७ जागांवर आघाडी मिळाली आहे. दुसरीकडे सत्ताधारी डाव्या आघाडीला केवळ ४८ जागांवर आघाडी आहे , तर भाजप-एनडीए फक्त ४ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे स्वतः मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांनंतर २००० मतांनी पिछाडीवर पडले आहेत.
राजकीय इतिहास पाहता केरळमध्ये डावी आघाडी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आलटून-पालटून सत्तेवर येतात. मात्र मागील विधानसभा निवडणुकीमध्ये डाव्या आघाडीने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून हा पायंडा मोडला होता. त्यावेळी विधानसभेत पराभवाचा धक्का बसला असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यातच काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्यांना धक्का बसला होता , ज्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला होता. आता याच निकालांची पुनरावृत्ती केरळम विधानसभा निवडणुकीत होताना दिसत आहे.
९ एप्रिल रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत केरळच्या जनतेने ७८.२७ टक्के मतदान केले होते. हा निकाल केवळ केरळसाठीच नाही तर राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. जर या निवडणुकीत केरळमध्ये पराभव झाला तर डाव्या पक्षांकडे देशातील एकाही राज्यात सत्ता शिल्लक राहणार नाही. १९७७ नंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण होईल. त्यामुळेच हा विजय डाव्यांसाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे.




